दिंडीचालक, वारकरी अन् भाविकांना मुक्कामासाठी वॉटरफ्रुप मंडप; पंढरपुरात १५ लाख भाविक येण्याची शक्यता
By Appasaheb.patil | Updated: July 12, 2024 16:57 IST2024-07-12T16:53:32+5:302024-07-12T16:57:03+5:30
दिवसेंदिवस पायी पालखीसोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्याही वाढत आहे.

दिंडीचालक, वारकरी अन् भाविकांना मुक्कामासाठी वॉटरफ्रुप मंडप; पंढरपुरात १५ लाख भाविक येण्याची शक्यता
आप्पासाहेब पाटील, पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै २०२४ रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी १२ ते १५ लाख वारकरी भाविक पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. दिवसेंदिवस पायी पालखीसोहळ्या सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्याही वाढत आहे. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. तसेच त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिंडींच्या मुक्कामासाठी पंढरपूर शहरालगत नवीन पाच ठिकाणी प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे.
आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय होऊ नये यासाठी पंढरपूर रेल्वे मैदान , भटुंबरे, गुरसाळे, गोपाळपूर, वाखरी या ठिकाणी दिंडीच्या मुक्कामासाठी निवारा, पिण्याचे व वापराचे पाणी, शौचालय, विद्युत व्यवस्था, आरोग्य सुविधा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांना मुक्कामासाठी वॉटरप्रुफ मंडप, शाळा, सभागृहात चांगली सोय करण्यात आली आहे. आषाढी यात्रा कालावधीत दिंडी चालक, वारकरी-भाविक यांना पायाभुत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी केली असून, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त निवाऱ्यासाठी वारकरी-भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.