'आपला माणूस' या प्रतिमेने भालकेंना तारले
By Admin | Updated: October 22, 2014 14:45 IST2014-10-22T14:45:10+5:302014-10-22T14:45:10+5:30
पाणी प्रश्नासाठी प्रामाणिकपणे केलेली धडपड यामुळे आ. भारत भालके यांची तयारी झालेली 'आपला माणूस' ही प्रतिमा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांना दुसर्यांदा विजयापर्यंत घेऊन गेली.

'आपला माणूस' या प्रतिमेने भालकेंना तारले
>मल्लिकार्जुन देशमुखे ■ मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकीय, सामाजिक घडामोडींविषयी असलेली प्रचंड सतर्कता, जनसंवाद, ३५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी प्रामाणिकपणे केलेली धडपड यामुळे आ. भारत भालके यांची तयारी झालेली 'आपला माणूस' ही प्रतिमा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांना दुसर्यांदा विजयापर्यंत घेऊन गेली. मोदी लाट व महायुतीचा प्रभाव निकामी ठरत भालकेंचा करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला.
अत्यंत मुरब्बी राजकारणी असलेले आ. भालके यांनी ३५ गावांचा पाणीप्रश्न या निवडणुकीत त्रासदायक ठरू नये, यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून वेळीच डाव साधला. या पाणी प्रश्नाबरोबर मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षातील नेते, मंत्री यांच्याकडे पाठपुरावा कायम ठेवला. त्याच गावातील नागरिकांच्या मतांनी भालकेंना निर्णायक आघाडी मिळवून दिली.
आ. भालकेंविरुद्ध टक्कर देत त्यांच्यावर मात करण्यासाठी किंवा कामाची पद्धतही गेल्या पाच वर्षांत विरोधक उभे करू शकले नाहीत. प्रशांत परिचारक हे शहराबरोबर ग्रामीण भागातही आ. भालकेंच्या विरोधात प्रभावी गट उभे करू न शकल्याने भालकेंसाठी ही जमेची बाजू ठरली. कमी वेळेत प्रभावी यंत्रणा उभारून शिवसेनेचे समाधान आवताडे यांनी आ. भालके व परिचारक यांना घाम फोडला. पहिल्याच प्रयत्नात ४१ हजार मते मिळवून त्यांनी मंगळवेढा तालुक्यात आपली शक्ती दाखवून दिली.
मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांबरोबर मरवडे, लक्ष्मीदहिवडी, ब्रह्मपुरी गण व भोसे गटातील मतदारांनी चांगली साथ दिल्याने विजयाचा पैलतीर गाठता आला. आ. भालकेंविरोधात प्रचार करताना मतदारांच्या हृदयाचा ठाव घेणारे प्रभावी मुद्देच न आढळल्याने मतदार धोका स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे आढळून आले.
------------
मागील २५ वर्षांत मंगळवेढा तालुक्याचा विकास खुंटला होता. दुष्काळी तालुका अशी ओळख असून, शेतकर्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठीच प्रयत्न करावे लागतील. - भारत भालके, आमदार
--------------
डिपॉझिट जप्त
■ राज्यात सत्ताधारी असणार्या राष्ट्रवादी पक्षाचा मंगळवेढा बालेकिल्ला असताना या पक्षाचे उमेदवार चंद्रकांत बागल यांना डिपॉझिट जप्तीची नामुष्की आली. गादेगाव येथील त्यांच्या घरातसुध्दा सी.पी. बागल यांना तिसर्या क्रमांकावर मतदारांनी फेकले आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.