राजकारणी, समाजसेवक एकत्र आल्यास विकास
By Admin | Updated: September 3, 2014 01:08 IST2014-09-03T01:08:38+5:302014-09-03T01:08:38+5:30
निशिगंधा माळी: जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण

राजकारणी, समाजसेवक एकत्र आल्यास विकास
सोलापूर : समाजसेवक नेहमीच राजकारण्यांना दोष देत केलेल्या कामांवर आक्षेप घेतात. हे दोघे कधी एकत्र बसून विकासाचा आराखडा बनवत नाहीत. ज्यावेळी समाजसेवक व राजकारणी एकत्र येऊन विचारविनिमय करतील, त्यावेळीच विकास होण्यास मदत होणार असल्याचा आशावाद जि. प. च्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा युवा पुरस्काराच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डुबे होते. यावेळी प्रताप कचरे यांना युवा तर ड्रीम फाउंडेशनला संस्था पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे उपस्थित होते. एक शिक्षक उत्तमरित्या अध्यापनाचे काम केल्यास त्याच्या हातून सात पिढ्यांचा उद्धार होऊ शकतो. अभियंता आयुष्यभर अभियंताच राहतो. डॉक्टर आपलाच पेशा करतो तर शिक्षक मात्र समाजातील विविध घटक घडविण्याचे काम करीत असल्याने देशाच्या जडणघडणीत त्याचा मोलाचा वाटा असतो. राजकारणात सध्या वाईट प्रवृत्ती जन्म घेत असल्याने अधोगती होत आहे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन निर्धार केल्यास विकास होणे शक्य आहे. राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिल्यास समस्या नष्ट होण्यास मदत होणार आहे. मात्र यावर कोणीच विचारमंथन करीत नसल्याने प्रश्न व समस्या तशाच असल्याचेही त्यांनी सांगितले. एकाला मिळालेले ज्ञान ते दुसऱ्याला दिल्यास दुसऱ्याला एक भाकरी मिळण्यास मदत होते. यासाठी प्रत्येकांनी ज्ञानाची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. माळी यांनी दिला. प्रास्ताविकात भाग्यश्री बिले यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये युवकांचा मोठा योगदान असल्याने शासन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देत असल्याचे सांगितले. यावेळी प्रताप कचरे व काशिनाथ भतगुणकी, अनिल देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.