मठात भाविक आढळून आल्यास मठ चालकांवरच होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:29+5:302021-07-09T04:15:29+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे ते आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची पाहणी करण्यासाठी आले होते. ...

मठात भाविक आढळून आल्यास मठ चालकांवरच होणार कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे ते आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची पाहणी करण्यासाठी आले होते. या दरम्यान त्यांनी प्रदक्षिणा मार्ग, श्री विठ्ठल मंदिर, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट आदी परिसराची पाहणी केली. यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस निरीक्षक राजेश देवरे, पोलीस नाईक किरण अवचर, पोलीस नाईक प्रशांत भस्मे उपस्थित होते.
पंढरीचा पांडुरंग महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे आषाढी यात्रेसाठी राज्यभरातील भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरपुरात गर्दी करतात. गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे शहर व आजूबाजूच्या गावात १७ ते २५ जुलैपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. परंतु संचारबंदीचा कालावधी सुरू होण्यापूर्वीच भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. शहरातील मठामध्ये राहत आहेत. यामुळे १७ व १८ जुलै रोजी शहरातील सर्व मठांची तपासणी करण्यात येणार आहे. मठामध्ये भाविक आढळून आल्यास संबंधित मठ चालकांवर कारवाई करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले.
गरज भासल्यास बाहेर जाण्यास परवानगी
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, पूर्ण संपला नाही. यामुळे कोणाला इतर गावातील रुग्णालयात जाण्याची गरज भासल्यास संचारबंदीच्या कालावधीतही जाऊ दिले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटातही बंदी
संचारबंदीच्या कलावधीत चंद्रभागा नदी वाळवंटात भाविकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. भाविक नदीकडे जाऊ नयेत, यासाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या घाटांवर बॅरिकेटींग करणार असल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
फोटो ::::::::::::::::::::::
पंढरपूर येथे आल्यानंतर चंद्रभागा नदीकडे जाणाऱ्या घाटांची पाहणी करताना जिल्हा पाेलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम आदी.