मज लागली विठुरायाची ओढ....

By Admin | Updated: July 8, 2014 00:44 IST2014-07-08T00:44:56+5:302014-07-08T00:44:56+5:30

वारकऱ्याचा आवाज

I have a desire for Vithurai ... | मज लागली विठुरायाची ओढ....

मज लागली विठुरायाची ओढ....


कुरुल: सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवून मुखी विठुनामाचा गजर करीत गेल्या ५० वर्षांपासून पंढरपूर वारी करीत असलेल्या वारकऱ्याचा आवाज शेवटचा ठरला. एस. टी. स्टँडवर पाठीमागून ठोकरल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. या वारकऱ्याचे नाव सीताराम तुकाराम भोसले (वय ७४, रा. अंकोली ता. मोहोळ) असे आहे.
अंकोली येथील सीताराम भोसले हे गेल्या ५० वर्षांपासून विठ्ठल भक्तीच्या ओढीने पंढरपूर वारी करीत असे. ही परंपरा त्यांचे वडील तुकाराम परशुराम भोसले यांच्यापासून आहे. हे भोसले घराणे मूळचे खवणीचे. ते अंकोलीला स्थायिक झाले. संपूर्ण घर शाकाहारी आणि वारकरी. ते स्वत: प्रत्येक महिन्याच्या एकादशीला वारीसाठी पंढरपूरला जात. आज सकाळी अंकोलीहून कोथाळे-पंढरपूर या एस. टी. ने. ७.४५ वाजता पंढरपूर येथे गेले. तेथील नवीन स्टँडवर उतरल्यावर लघवीसाठी पाठीमागील बाजूस गेले असताना यवतमाळ डेपोच्या एस. टी. ड्रायव्हरने (एम. एच. ०४ वाय ५७१२) गाडी रिव्हर्स घेत असताना पाठीमागे उभे असलेल्या भोसले यांना जोरात ठोकर दिली. त्यामुळे त्यांच्या उजव्या पायावरुन व कमरेवरुन ड्रायव्हर साईडचे चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले.
ऐन आषाढी वारीच्या काळात पंढरपुरातच एका वृद्ध विठ्ठल भक्तावर काळाने घाला घातला. यामुळे अंकोलीतील त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ शोकाकुल झाले होते. अत्यंत मनमिळावू व धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
वारकरी सीताराम भोसले यांची वडिलांपासून चालत असलेली वारीची परंपरा आता त्यांचा मुलगा लक्ष्मण हा पुढे चालविणार आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच विठ्ठलाच्या भक्तीची ओढ आहे. विशेष म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीबरोबर त्यांचे कुटुंब देशसेवेत आहे. कारण त्यांचा मुलगा लष्करी सेवेतून निवृत्त झाला आहे तर दुसरा मुलगा सध्या भोपाळ येथे लष्करात आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: I have a desire for Vithurai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.