सोलापूर : हैदराबाद रोडवरील कृषी संशोधन केंद्रालगत गॅरेजमध्ये थेट बल्कर घुसल्याने तिघे ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. शनिवारी सायंकाळी ६:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात हैदराबाद रोडकडे जाणाऱ्या आणि सोलापूरकडे येणाऱ्या दोन दुचाकींचा चक्काचूर होऊन दोघे जागीच ठार झाले, तर एक जण शासकीय रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच मरण पावला.
आसिफ चाँदपाशा बागवान (वय ४५), तोहीद माजीद कुरेशी (वय २०, रा. सरवदेनगर, सोलापूर), विवेकानंद राजकुमार लिंगराज (वय ५५, रा. सतनाम चौक, लष्कर, सोलापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये वाजीद अलीम कुरेशी (वय ४९), माजीद महीबूब चौधरी (वय ३६, रा. दोघे सरवदेनगर, सोलापूर), करीम बादशहा बेपारी (वय २८, रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) यांच्यासह अन्य एक अशा चौघांचा समावेश आहे. टायर फुटल्याने ताबा सुटलाहैदराबाद रोडवर सायंकाळी नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ असताना अचानक हैदराबाद रोडकडे जाणाऱ्या एम. एच. ४४ यू ७४९५ या बल्करचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि याचदरम्यान सोलापूरकडून हैदराबाद रोडकडे आपल्या स्कूटरने जाणाऱ्या विवेकानंद लिंगराज यांना सर्वप्रथम उडवले. याचदरम्यान, हैदराबाद रोडने दुचाकीवरून येणाऱ्यालाही उडवले. यात दोघे गंभीर जखमी होऊन मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले, तर तोहीद कुरेशी हा त्याच्या तोहीद बॉडी बिल्डर या गॅरेजमध्ये ग्राहकांच्या वाहनांचे काम करीत असताना बल्कर थेट गॅरेजमध्ये घुसल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातस्थळी पोलिसांनी बघ्यांच्या गर्दीला पांगवून तातडीने क्रेनच्या मदतीने गॅरेजमध्ये घुसलेला बल्कर काढला.
वाहने चक्काचूरसुसाट बल्करच्या या अपघातात दुचाकीसह अन्य वाहने चक्काचूर झाली. काय घडतेय हे कळण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने एकच हलकल्लोळ उडाला. आरडाओरडा सुरू झाला. गॅरेजच्या बाजूला असलेल्या पंक्चरच्या दुकानात काम करणारा कामगारही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.