शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे होतेय वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:45+5:302021-08-21T04:26:45+5:30
विजापूर-पंढरपूर या महामार्गामुळे मंगळवेढा शहरामध्ये अवजड वाहने येतात. शहरातील दामाजी चौकात दिवसभर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. येथेच ज्युनिअर ...

शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे होतेय वाहतुकीची कोंडी
विजापूर-पंढरपूर या महामार्गामुळे मंगळवेढा शहरामध्ये अवजड वाहने येतात. शहरातील दामाजी चौकात दिवसभर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. येथेच ज्युनिअर कॉलेज, माध्यमिक प्रशाला असल्याने विद्यार्थ्यांची आवक-जावक असते. काही अंतरावर बसस्थानक असल्याने तालुका व जिल्हा तसेच कर्नाटक राज्यातून प्रवाशांची ये-जा कायम असते. वाहतूक शाखेचे पोलीस अवजड वाहनावर ठोस कारवाई करीत नसल्यामुळे अवजड वाहने शहरात प्रवेश करीत असल्याचे चित्र आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवेढा शहरातील अवजड वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना थांबविण्याच्या सूचना करूनही अद्यापही अवजड वाहतूक शहरातून सुरू असल्याने पायी चालत जाणाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. अवजड वाहने शहरात येऊ नयेत, यासाठी पंढरपूर बायपासजवळ लोखंडी कमान उभी केली होती. ही कमान एका ट्रकने पाडल्यामुळे तो ट्रक पोलीस स्टेशन आवारात आणून लावला आहे. त्या ट्रकमालकाकडून नुकसानभरपाईही वसूल केल्याचे वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही ती कमान नव्याने उभी केली नाही.
याबाबत अधिक माहिती घेतली असता नगरपालिकेकडून अवजड वाहनांना प्रतिबंध करण्याबाबत सहकार्य मिळत नसल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. परिणामी पोलीस प्रशासन व नगरपालिकेकडून वेळकाढूपणा केला जात असल्याची भावना शहरवासीयांमधून व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासन व नगरपालिकेने तत्काळ अवजड प्रतिबंध घालून वाहतुकीची कोंडी थांबवावी, अशी मागणी होत आहे.
ओळी :
मंगळवेढा शहरातून अवजड वाहन जात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.