आयुष्य संपलेल्या पुलांवरून धोकादायक वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 03:29 PM2019-05-13T15:29:08+5:302019-05-13T15:31:57+5:30

अक्कलकोट तालुक्यातील परिस्थिती; पुलांचे कधी काय होईल सांगता येणार नाही !

Hazardous traffic started from the bridge ended | आयुष्य संपलेल्या पुलांवरून धोकादायक वाहतूक सुरू

आयुष्य संपलेल्या पुलांवरून धोकादायक वाहतूक सुरू

Next
ठळक मुद्देआयुष्य संपलेल्या जुनाट पुलांपैकी अक्कलकोट-कर्जाळ पूल फार वर्षांपूर्वी बांधलेलाराष्ट्रीय महामार्ग असल्याने लांब पल्ल्यांची जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असतेया पुलावरील वाहतुकीचा भार लक्षात घेता  नव्याने बांधणी होणे गरजेचे

शिवानंद फुलारी 

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील विविध मार्गांवरील पाच पुलांचे आयुष्य संपल्याने ते धोकादायक बनलेले आहेत़ अशा परिस्थितीतही त्यावरून वाहतूक सुरूच आहे. या पुलांचे कधी काय होईल, याची शाश्वती नसतानाही नाईलाजाने नागरिकांना त्यावरूनच जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत आहे.

तालुक्यात आयुष्य संपलेल्या जुनाट पुलांपैकी अक्कलकोट-कर्जाळ पूल फार वर्षांपूर्वी बांधलेला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने लांब पल्ल्यांची जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या पुलावरील वाहतुकीचा भार लक्षात घेता  नव्याने बांधणी होणे गरजेचे होते. याच मार्गावरील कुंभार गावाजवळील पूल केवळ जुनाच नसून, रुंदीने कमी आहे. अनेक वेळा समोरून एखादे वाहन येत असल्यास दुसरे वाहन पास झाल्यावरच जावे लागते. या पुलाची पडझड झाली आहे. सर्वाधिक धोकादायक पूल म्हणून या पुलाची नेहमी चर्चा होत असते. हा सुद्धा राष्ट्रीय महामार्गच आहे.

अक्कलकोट-गाणगापूर रोडवरील बोरीउमरगे पूलही जुनाच आहे. याची दुरुस्ती करण्यात आली असून, नव्याने करण्याचे काम सुरू आहे. सध्यातरी यावरूनच दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. 

अक्कलकोट-जेऊर रस्त्यावरील कल्याणनगरजवळील राठोड यांच्या शेताजवळील सिडीवर्क पूल आहे. या मार्गावरून संपूर्ण तडवळ भागाची वाहतूक अवलंबून आहे. कर्नाटकात प्रवेश करण्याचा मार्ग आहे. तरीही मागील अनेक वर्षांपासून आहे तीच परिस्थिती कायम आहे. पावसाळ्यात थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी येते. 

बबलाद ते बबलाद तांडा या मार्गावरून कर्नाटक-माशाळमार्गे एन्ट्री होत असते. हा जिल्हा मार्ग असून, अत्यंत खराब झाला आहे. संबंधित विभागाचे अधिकारी वारंवार या कामासाठी निधीची मागणी करीत असले तरी अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे.

वरील सर्व पाचही मार्ग हे वर्दळीचे आहेत. घटना घडली की अधिकारी, पदाधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतात. भविष्यात एखादी वाईट घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा त्यापूर्वीच काम व्हावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

 

Web Title: Hazardous traffic started from the bridge ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.