वाळूज परिसरात रानडुकरांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST2021-02-12T04:21:35+5:302021-02-12T04:21:35+5:30
वाळूज : वाळूज व परिसरात देगाव, भैरेवाडी, मनगोळी, साखरेवाडी, भागाईवाडी शिवारात रानडुकरांनी पिकांची आणि फळबागांची नासधूस करून हैदोस ...

वाळूज परिसरात रानडुकरांचा हैदोस
वाळूज : वाळूज व परिसरात देगाव, भैरेवाडी, मनगोळी, साखरेवाडी, भागाईवाडी शिवारात रानडुकरांनी पिकांची आणि फळबागांची नासधूस करून हैदोस घातला आहे. वाळूज येथील शिवारात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या ज्वारी हुरड्यात आली आहे. ज्वारीचे धाटे अर्धवट तोडून कुरतडली आहेत, यामुळे ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच फळबागामधील पेरू, डाळिंब, केळी या पिकांचे नुकसान केले आहे. हनुमंत जाधव, सागर घडगे यांचे कांदे, पेरू यांचे नुकसान केले आहे, तसेच दादा कादे यांचे डाळिंब, तर लहू मोटे, वैभव मोटे, भाऊ खांडेकर, मिलिंद लामगुंडे, प्रताप घोडके, रेवणसिद्ध साखरे यांच्या ज्वारीचे नुकसान झाले. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
----
भोगावती नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक सुरूच
वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज येथील भोगावती- नागझरी नदीपात्रातून रात्री-अपरात्री ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाळू वाहतूक सुरूच आहे. वाळूज हे बार्शी, माढा आणि उत्तर सोलापूर या तीन तालुक्यांच्या शिवेवरील अगदी टोकाचे गाव आहे. या गावी भोगावती- नागझरी या दोन नद्यांचा संगम झाला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी भोगावती नदीपात्रातील लिलाव होणाऱ्या वाळू उपशाला उच्च न्यायालयातून स्थगिती आणली आहे. तरीही या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचोरी सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
---
स्मशानभूमीची येलमवाडीकरांची मागणी
वाळूज : मोहोळ तालुक्यातील शेवटच्या टोकाचे येलमवाडी हे गाव असून, या गावाला ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून स्मशानभूमी नाही. गावालगत ओढ्याच्या काठी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. याठिकाणी जायला रस्ता नाही. रस्त्यात चिलारीची झाडे आडवी आहेत. त्याठिकाणी पाणी आणि लाइटचीही व्यवस्था नाही. मृत्यूनंतरही या गावात हाल सोसावे लागतात.
---
वाळूज येथे गरोदर मातांची कोरोना तपासणी
वाळूज : माेहाेळ तालुक्यात वाळूज येथे प्राथमिक अरोग्य उपकेंद्र यांच्या वतीने येथील पंधरा गरोदर मातांची अँटिजन रॅपिड टेस्ट करण्यात आली. सर्व गरोदर मातांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली.
यावेळी नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्यसेविका जे.आर. शेख, पर्यवेक्षक धोत्रे, आशासेविका भारती नगूरकर, वंदना कादे, सुमन कुंभार ग्रामसेवक मानसिंग जाधव आदींची उपस्थिती होती.