द्राक्ष हंगामास लवकरच प्रारंभ होणार
By Admin | Updated: November 28, 2014 23:47 IST2014-11-28T22:42:11+5:302014-11-28T23:47:42+5:30
मिरज पूर्वमध्ये तयारी : हंगामपूर्व तीनशेहून अधिक दराची अपेक्षा

द्राक्ष हंगामास लवकरच प्रारंभ होणार
प्रवीण जगताप - लिंगनूर -मिरज पूर्व भागात यंदा डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात द्राक्षाचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाने बसलेला रोगाचा फटका आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यातून औषधांच्या जोरावर पिकविलेली द्राक्षे दरात तरी तारणार का, याची चिंता उत्पादकांना लागून राहिली आहे.
द्राक्ष उपादनासाठी नाशिकपाठोपाठ सांगली आणि सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे, पण हंगामाची सुरुवात सर्वप्रथम सांगली जिल्ह्यात होते. त्यातही प्रतिवर्षी मिरज पूर्व भागातून प्रारंभ होतो. मिरज पूर्व भागात किमान २५ टक्के द्राक्ष उत्पादक जुलैअखेर व आॅगस्ट महिन्यातील फळछाटणी घेण्याचे धाडस करतात. चांगल्या दराच्या अपेक्षेने रोग व हवामानाचा धोका पत्करून ही छाटणी घेतात. मागील बऱ्याच वर्षांचा अनुभव लक्षात घेता मिरज पूर्व भागातील संतोषवाडी, खटाव, कदमवाडी, बेळंकी, लिंगनूर येथून जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास प्रारंभ
होतो.
गतवर्षी डिसेंबर महिन्यातच हंगाम सुरू झाला होता. पहिल्या द्राक्षांना व्यापाऱ्यांनी २८१ रुपये प्रति चार किलो असा दर दिला होता. द्राक्षांचा रंग, रूप, चव, आकार, साखर आदी बाबी तपासून त्यांना दर निश्चित केला जातो. येथील द्राक्ष हंगामास लवकर प्रारंभ होतो म्हणून हैदराबाद, आंध्र प्रदेश, शिमोगा या भागातील व्यापारीही या भागाकडे विशेष लक्ष ठेवून असतात. यंदा मागील दोन महिन्यांचा आढावा घेतल्यास अवकाळी पाऊस, रोगांचे थैमान या परिस्थितीतून द्राक्षबागा कशाबशा वाचवत अनेकांनी हंगामाची तयारी केली आहे. त्यामध्ये औषध फवारणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. त्यामुळे यंदा तास-ए-गणेश, सोनाक्का, आंबेसोनाक्का या द्राक्षांना तीनशे रुपयांचा दर, तर शरद सीडलेस (काळी) द्राक्षांना चारशे ते साडेचारशे रुपयांचा दर मिळावा, अशी अपेक्षा आगाप छाटणी घेतलेल्या उत्पादकांना आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदीसाठी व्यापाऱ्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यावेळीच यंदाचा दर निश्चित होणार आहे. या साखर कमी भरणाऱ्या द्राक्षांना हंगामपूर्व काढणी व उपलब्धतेमुळे परराज्यातही अपेक्षित दर मिळतो. त्यामुळे व्यापारी यंदा चांगला दर देऊन रोग आणि अवकाळीने हडबडलेल्या द्राक्ष उत्पादकांना दिलासा देतील, या अपेक्षेत उत्पादक आहेत.