सुजल पाटील
सोलापूर : कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र काम करणाऱ्या २४७ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी २३८ पोलिसांनी कोरोनावर मात करून पुन्हा कामावर हजर झाले आहेत. आतापर्यंत फक्त ५ पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यापैकी दोघांना प्रत्येकी ५० लाखांची शासकीय मदत मिळाली आहे. सध्या फक्त ५ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
कोरोना, लॉकडाऊन, नाकाबंदी, अतिवृष्टी, मंत्र्यांचे दौरे, आंदोलने, अनलॉकनंतर झालेली लोकांची गर्दी यांसह अन्य कारणांमुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा कळत नकळत कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांशी संपर्क झाला. त्यातून ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. वेळेत उपचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले. त्यामुळे २३८ पोलिसांनी कोरोनावर मात केली.
५५ वर्षांवरील १२९ जण झाले रुजू
कोरोनाकाळात शासनाच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पाेलीस दलातील १२९ जणांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. आंदोलने, मंत्र्यांचे दौरे वाढल्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला. त्यातच वरिष्ठांच्या आदेशानुसार विश्रांतीचा सल्ला दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. कर्मचारी कामावर रुजू झाले तरी त्यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
दोघांना मिळाली प्रत्येकी ५० लाखांची मदत
कोरोनाकाळात कामावर असताना कोरोनाची लागण झाली अन् त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास शासनाकडून ५० लाख रुपये मदत देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांस प्रत्येकी ५० लाख रुपये मदतीचा धनादेश सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सुपूर्द केला. अन्य दोन कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, लवकरच त्यांना मदत मिळणार असल्याचे सांगितले.