श्री महालक्ष्मीसाठी सोन्याची पालखी
By Admin | Updated: July 29, 2014 00:04 IST2014-07-28T23:57:50+5:302014-07-29T00:04:50+5:30
पंधरा कोटी खर्च : त्रिशताब्दी वर्षात होणार लोकार्पण

श्री महालक्ष्मीसाठी सोन्याची पालखी
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मूर्तीच्या पुनर्स्थापनेला २०१५ मध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. या त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त श्री महालक्ष्मीसाठी लोकसहभागातून सोन्याची पालखी बनवण्यात येणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पालखीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, त्यासाठी कोल्हापूरच्या नागरिकांनी व भाविकांनी यथाशक्ती सोनेरूपात अथवा धनादेशाच्या रूपात देणगी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले, साडेतीन शक्तीपीठ असलेल्या महालक्ष्मी मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला २०१५ सालच्या दसऱ्याला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रसंगाचे औचित्य राखून भाविकांच्या आणि कोल्हापुरातील नागरिकांच्या सहकार्यातून महालक्ष्मीसाठी सोन्याची पालखी बनवण्यात येणार आहे. या सोबतच सोन्याचे मोर्चेल, चवऱ्या, सुवर्ण कलशांकीत सूर्य-चंद्र, अबदागिऱ्या बनवण्याची संकल्पना आहे. अत्यंत पारदर्शीपणे हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडून रितसर विश्वस्त मंडळाची स्थापना केली जाईल. उत्तम दर्जाच्या लाकडापासून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पालखी बनवल्यानंतर ती सोन्याने मढवण्यात येणार आहे.