गुलालात न्हाली अवघी म्हसवडनगरी...!

By Admin | Updated: November 23, 2014 23:43 IST2014-11-23T21:38:09+5:302014-11-23T23:43:34+5:30

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं : श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरीचा रथोत्सव उत्साहात

Golat Nahali is the only Mhaswadagari ...! | गुलालात न्हाली अवघी म्हसवडनगरी...!

गुलालात न्हाली अवघी म्हसवडनगरी...!

म्हसवड : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलंऽऽऽ’च्या गजरात लाखोंच्या भाविकांच्या उपस्थितीत येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरीच्या रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या म्हसवडच्या सिद्धनाथाच्या रथयात्रेसाठी लाखो भाविक उपस्थित होते. यात्रेच्या मुख्यदिवशी पहाटे श्रींच्या मूर्तीची विधिवत पूजा करून काकड आरती करण्यात आली.
देवाच्या मूर्तीस अभिषेक करून पंचधातूची मूर्ती सालकरी व देवाचे मुख्य पुजारी सागर गुरव यांच्या घरी नेण्यात आल्या. दुपारी एक ते दीडच्या सुमारास या मूर्ती पालखीत ठेवून वाजतगाजत रथापर्यंत नेण्यात आल्या. तेथे या मूर्ती रथात स्थापन केल्या. यावेळी भाविकांनी सिद्धनाथाच्या नावाचा जयघोष केला.
भोजराज देवाच्या सासनकाठ्या व कऱ्हाड येथील मानाच्या काठ्यांची भेट झाली. भाविकांनी श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर रथयात्रेस सुरुवात झाली. रथावर उपस्थित भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची उधळण केली. निशाणे लावून रथ सजवण्यात आला होता.
कऱ्हाड, कालगाव, ढेबेवाडी, जांभूळणी, शिराळा येथील मानाच्या काठ्या व आसणे यांच्या भेटीचा कार्यक्रम माणनदीच्या पात्रात पार पडला. त्यानंतर माळी, सुतार, लोहार समाजातील मानकऱ्यांनी रथ ओढण्यास सुरुवात केली.
भाविकांनी भक्तिभावाने ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलंऽऽऽ’च्या गजरात रथ ओढण्यासाठी पुढे येत होते. रथमार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण केली. यामुळे सर्व रस्ते गुलालाने न्हाऊन निघाले होते. भाविकांच्या गर्दीने फुललेल्या रस्त्यावरून रथयात्रा निघाली. सायंकाळी रथयात्रा वडजाई धोब्याजवळ आली. तेथे रिवाजाप्रमाणे वडजाई देवीला साडीचोळीचा आहेर केला. यावेळी नवसाची मुले रथावरून ओवाळून टाकण्याची प्रथाही पार पाडण्यात आली.
परंपरेनुसार रथावर हजारो निशाणे वाहण्यात आली. रथाचे दोर ओढण्यासाठी मानकऱ्यांबरोबरच भाविकांमध्ये स्पर्धा होती. रात्री उशिरा रिंगावण पेठेत शहर प्रदक्षिणा पूर्ण करून रथ जागेवर नेण्यात आला.
रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याला असून, रथ ओढण्याचा मान माळी समाज व बारा बलुतेदारांचा आहे. अजिराव राजेमाने, आबासाहेब राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, तेजसिंह राजमाने, सयाजी धनाजीराव राजेमाने रथावर विराजमान होते.
हत्तीमंडपात हत्तीसमोर फोडण्यात येणारा नारळ सोलून आणल्याशिवाय फोडला जाणार नाही. यामुळे मंदिरात नारळाची केसर पडलेली नव्हती.
आमदार जयकुमार गोरे यांनी रथाचे दर्शन घेतले. रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आमदार प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, माळशिरसचे माने-पाटील, कल्याणराव डुबल, रघुनाथ डुबल, मोहन डुबल, सिद्धोजीराव डुबल, हणमंत डुबल, दिग्विजय डुबल, हर्षवर्धन डुबल, नगराध्यक्ष विजय सिन्हा, मुख्याधिकारी पल्लवी मोरे-पाटील, माजी नगराध्यक्ष विलास माने, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब माने, धनाजी माने, धनाजी भोज, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. कोरे यांनी परिश्रम घेतले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Golat Nahali is the only Mhaswadagari ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.