गोची व्हायलीय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 03:26 PM2019-10-07T15:26:48+5:302019-10-07T15:27:11+5:30

समाचार चौकातील पूर्वेकडच्या बोळातील पापय्याचा कट्टा सर्वपक्षीय राजकीय मित्रांनी आज गच्च भरून गेला होता.

Gochi violet ... | गोची व्हायलीय...

गोची व्हायलीय...

googlenewsNext

- रवींद्र देशमुख

समाचार चौकातील पूर्वेकडच्या बोळातील पापय्याचा कट्टा सर्वपक्षीय राजकीय मित्रांनी आज गच्च भरून गेला होता. हा चौक म्हणजे शहराच्या दिशेला राहणाºया या मित्रांचं भेटण्याचं मध्यवर्ती ठिकाणच होतं. रात्रीची जेवणं उरकल्यानंतर काही खासगीत राजकीय गुफ्तगू करायचं असेल तर हे सर्वच मित्र चौकातील या कट्ट्यावर जमतात. या सर्वांचाच आमच्यावर विश्वास असल्यामुळे अन् आम्ही पत्रकारितेत वावरत असल्यामुळे आम्हाला थोडी जास्त राजकीय अक्कल असेल, असा त्यांचा समज. त्यामुळे बोलावलं की तिथं जायची तसदी घ्यावी लागते..पेपरचं काम संपवून लवकरच जाऊन आम्ही कट्ट्यावर जाऊन थांबलो. काही वेळातच कन्ना चौकातून अंबाण्णा आले..चौपाडातून पैलवानचा मावा चघळत चघळत शिरपा आला.

लगेचच विजापूर वेशीतून ईस्माईलभाईचं आगमन झालं. एकसो बीस पानाची पिचकारी मारून त्यांनी सलाम केला...बाकी सगळेच आले; पण बाळीवेशीतील मल्लूला जरा वेळ लागत होता...राजवाडे चौकातून येताना मालकांच्या समर्थकांबरोबर बोलण्यात तो गुंतला होता; पण इतक्यात तोही आला....प्रत्येकाच्याच चेहºयावर काळजी दिसत होती..त्यांची चिंता मलाही कोड्यात टाकणारी होती. ईस्माईलभाईनं कोंडी फोडली अन् पोटावर हात फिरवत फिरवत बोलायला लागले, ‘क्या, करनेका इस टैम समझ में नही आ रहा है’, सब उम्मीदवार इधर के उधर हो गये. हम क्या करे? ये हमारे लिए अच्छा तो बुरा नही...आज तक साब के लिए हम काम करते आए है. लोकसभा के टैम साब के लिए बेस, बारा इमाम चौक, ओ निचे का भारतीय चौक...सब सब हम पॅक करते. ताई के वक्त तो एक होट इधर का उधर नही होने देता था!..मगर अब क्या करे?  मालक इधर धनुषबान लेके खडे है!..अपने पप्पू के इंजिनिअर अ‍ॅडमिशन में मेरे को मदत किये थे..ओ बँक में से लोन बी लिया है. अब ताई का प्रचार किया तो मालक नाराज होंगे और मालक का प्रचार किया तो साब को क्या मु दिखाने का?...सब साली गोची हो गयी है.

ईस्माईलचं बोलणं मल्लूला पटलं होतं..कन्नड टोनच्या मराठीत तो स्वत:ची व्यथा सांगू लागला..आमची बी काय, तसंच हाय की. आता आम्ही पडलो कमळाचे कार्यकर्ते. त्यामुळं विजूमालकासाठी आम्हाला काम करावंच लागतं..पण वकीलसाहेबांचं आमचं रिलेशन बी चांगलं हाय! आता ते उमेदवार नसले तरी त्यांची भूमिका येगळी हाय ना!..मग उगं ते बी नाराज व्हायला नगं म्हणतो मी...काय करू माझी बी गोची व्हायलीय!

कन्ना चौकातला अंबण्णा तर तात्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता; पण तितकाच कट्टर हातवाला...आता त्याला तर बिचाºयाला काय ठाऊक? अण्णा इकडं शहर उत्तरमधून उमेदवारी टाकतेत म्हणून..तात्यानं हयात असताना अंबण्णाला शिक्षण मंडळावर घेतलं होतं. त्यामुळे आता विधानसभेला अण्णासाठी काय तर करावं लागतंय. ही अंबण्णाला चिंता होती...हाताची निष्ठा जपायची की, तात्यांचं उपकार पाहायचे?..अंबण्णानं आपली गोची बोलून दाखवली..शिरपा कोणत्या पक्षाचा तसा अधिकृत कार्यकर्ता नाही; पण त्याचीही गोची झाली...त्याची दररोजची उठबस लकी चौकातल्या शिवपार्वती लॉजवर..रात्री साहेबांच्या पांढºया अ‍ॅक्टिव्हावरही अनेकदा तो फिरायचा...इकडं आनंददादा पण शिरपाचे दोस्त अन् सकाळी दत्त, शनीचं दर्शन घ्यायला जाताना राजवाडे चौकात मालकांच्या आॅफिसात नमस्कार ठोकून चहा - पाणी करून पुढं जायचं हा त्याचा दररोजचा राबता..निवडणुकीत काय करावं?...शिरपाचीही गोची झाली होती.

सर्वांनी आपापल्या व्यथा मांडून आम्हा पामर पत्रकाराकडं त्यांनी आशेने पाहिलं..आता आम्ही काय तोडगा सांगावा?...आमचीच गोची झाली..सरळ त्यांना सांगून टाकलं.. इलेक्शनच्या काळात काय पण करू नका..बालाजीची तिकिटं बुक करा, नाही तर गोव्याबिव्याला जाऊन एखादी टूर करून या निकालाच्या दिवशी सोलापुरात..सर्वांनी माना हलविल्या. इतक्यात पोलिसाची गाडी आली अन् आमची पांगापांग झाली.

Web Title: Gochi violet ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.