आले वैष्णव डिंगर

By Admin | Updated: July 7, 2014 01:10 IST2014-07-07T01:10:25+5:302014-07-07T01:10:25+5:30

प्रमुख पालख्या; वैष्णवांची मांदियाळी पंढरपूर तालुक्यात

Gaya Vaishnav Dinger | आले वैष्णव डिंगर

आले वैष्णव डिंगर

 भंडीशेगाव: आषाढीचा सुखसोहळा पाहण्याच्या उत्कट ओढीने गेले काही दिवस ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता अखंड हरिनामाचा गजर करीत श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत सोपानकाका या पालख्यांसह लाखो संतसज्जनांच्या मांदियाळीने आज टप्पा येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. ठाकुरबुवांच्या समाधीजवळ व्यवहारे व कोळेकर यांच्या शेतात आज सकाळी माऊलींच्या सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण झाले. आजचे वैशिष्ट्य म्हणजे रिंगण सोहळा पाहण्यासाठी सोहळ्याचे मानकरी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे-सरकार व महादजीराजे शितोळे-सरकार उपस्थित होते.
विस्तीर्ण पटांगणात झालेल्या रिंगणात अश्वांनी चार फेऱ्या मारल्या. त्यानंतर उडीचा खेळ खेळून चिंब झालेला सोहळा तोंडले येथे दुपारच्या भोजनाला आला. दरम्यान, अकलूजहून आलेला जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा धावा करून बोंडले येथे दाखल झाला. तर यावेळी बोंडले येथेच सोपानकाकांची पालखी विसावा घेत होती. सर्वात पुढे तुकाराम महाराज त्यानंतर सोपानकाका आणि ज्ञानेश्वर माऊली या तीन प्रमुख पालख्यांसह विविध पालख्यांनी आज टप्पा येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला.
पालख्यांच्या स्वागतासाठी आ. बबनराव शिंदे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, पं.स. सभापती पुष्पा जाधव, उपसभापती विष्णू बागल, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार गजानन गुरव, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, उपप्रमुख महादेव आयरे, केसकरवाडीचे सरपंच हणमंत मासाळ, पं.स. सदस्य तानाजी केसकर, सहकार शिरोमणीचे संचालक पांडुरंग कौलगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते.
----------------------------
पालखी मार्गाने पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या पालख्या
आज श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत सोपानकाका, श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली, श्रीसंत जगनाडे महाराज, श्रीसंत निळोबाराय महाराज, श्रीसंत कान्हुराज महाराज, श्रीसंत बालयोगी, श्रीसंत गोरोबाकाका आदी पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला.
सोपानकाका-माऊलींची बंधूभेट
श्रीसंत सोपानकाकांची पालखी दसूरपाटी येथे विसावा घेत असताना माऊलींची पालखी बाजूने पुढे गेली. टप्पा येथे माऊलींची पालखी विसावा घेत असताना सोपानकाकांची पालखी माऊलींच्या पालखीजवळ आली. यावेळी दोन्ही बंधूंच्या पालख्यांची भेट घडवून आणण्यात आली. दोन्ही पालख्यांच्या मानकऱ्यांनी एकमेकांना नारळ प्रसाद देऊन पादुकांचे दर्शन घेतले. सायंकाळी माऊलींची पालखी भंडीशेगाव मुक्कामी तर तुकोबांची पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी गेली.

Web Title: Gaya Vaishnav Dinger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.