गावरान पंचपंक्वानाचा आस्वाद घेत ऊस, ढाळे अन् हुरडाही खाल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST2021-01-13T04:56:42+5:302021-01-13T04:56:42+5:30
मोहोळ तालुक्यातील कामती परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी वेळआमावस्या साजरी केली. कोरोना काळात कुठेही बाहेर फिरता आले नाही. आता त्याची ...

गावरान पंचपंक्वानाचा आस्वाद घेत ऊस, ढाळे अन् हुरडाही खाल्ला
मोहोळ तालुक्यातील कामती परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी वेळआमावस्या साजरी केली. कोरोना काळात कुठेही बाहेर फिरता आले नाही. आता त्याची भीती कमी झाल्याने अनेक शहरवासीयांनी भल्या पहाटेच गावाकडचा रस्ता धरला. शेत शिवारात गर्दी पाहण्यास मिळाली.
मोहोळ तालुक्यातील वाघोली, सोहाळे, लमाणतांडा, कामती बुद्रुक, कामती खुर्द, जामगाव खुर्द, जामगाव बुद्रुक, मिरी, येणकी आणि अरबळी, आदी परिसरातील रस्त्यावर शहरवासीयांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ दिसून आली.
शेतकऱ्यांनी आनंदाने शहरवासीयांना वेळआमावस्येचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या निमंत्रणाचा मान राखत शहरवासीय सहकुटुंब गावात आल्याचे दिसून आले.
झाडाखाली बसली पंगत
पहाटेपासून शेतकरी कुटुंबाची लगबग सुरू होती. दुपारपर्यंत सर्वच मंडळी टोपलीत सर्व खाद्यपदार्थ घेऊन शेतात पोहोचले. त्यानंतर लगेच शेतात पाच पांडवाची मांडणी करून पूजन केले. यावर्षीतरी शेतातील उत्पन्नात वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली. त्यानंतर गावकडचे अन् शहरवासीयांची झाडाच्या सावलीत, बांधावर पंगत बसली. जेवणामध्ये खीर, अंबील, भजी, बाजरीच्या पिठाचे उंडे, भात, पुरणपोळी आशा पद्धतीचे गावरान पंचपंक्वानाचे जेवण होते. त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर ऊस, ढाळे आणि हुरडाही खाल्ल्याचे अनेकांनी सांगितले.