दीडशे वर्षांपूर्वीच्या पुलाला हवाय ५५ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:31+5:302021-07-09T04:15:31+5:30
पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन करमाळा मतदारसंघातील प्रलंबित ...

दीडशे वर्षांपूर्वीच्या पुलाला हवाय ५५ कोटींचा निधी
पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन करमाळा मतदारसंघातील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी मंजुरीची मागणी केली.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली ते डिकसळ (प्रजिमा १९०) दरम्यान भीमा नदीवर एक मोठा पूल असून, सद्य:स्थितीत या पुलास जवळपास १५० वर्षे झाली आहेत. हा सर्वाधिक जुना असा पूल आहे. सध्या या पुलाची अवस्था बिकट असून, दळणवळणासाठी तो धोकादायक बनला आहे. या पुलामुळेच करमाळा व पुणे जिल्हा सीमा यांना जोडता येते.
----
३० गावांकडून पुलाचा वापर
करमाळा तालुक्यातील जवळपास ३० गावांचे नागरिक पुणे, भिगवण, बारामती येथे जाण्यासाठी या पुलाचा वापर करतात. विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, एसटी बसेस, मालवाहतूक वाहने, ऊस वाहतूक वाहनांना या पुलाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. ब्रिटिशकालीन पूल असल्याने पंधरा वर्षांपूर्वी या पुलाच्या पुनर्निर्माणासाठी शासनास ब्रिटिश प्रशासनानेसुद्धा कळवले आहे. परंतु, अद्याप याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता या पुलाच्या कामास निधी मिळावा म्हणून आपण पाठपुरावा चालू ठेवला असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
---