Solapur Murder: आर्थिक देवाणघेवाणच्या कारणावरून आचारी मित्रानेच सलून व्यावसायिक संतोष किसन चव्हाण (वय ४५, रा. खर्डी, ता. पंढरपूर) या मित्राचा बुटाच्या लेसने गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, तपास अधिकारी यांनी आरोपी गोविंद बबन शिंदे (वय ३५, रा. जालना, सध्या रा. नातेपुते, ता. माळशिरस) यास सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पोतदार यांनी त्यास २४ जानेवारीपर्यंत ५ दिवसांची पोलिस कोठडी दिल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संतोष हा दुकानातून बाहेर पडला, मात्र तो घरी पोहोचलाच नाही. दरम्यान, ३० ते ४० वर्षीय पुरुष इसमाचा मृतदेह कमलापूर येथील न्यू आकाश परमिट रूमच्या पाठीमागील आंब्याच्या बागेत मिळून आला. ही घटना रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतमालकाच्या निदर्शनास आली. त्यांनी सांगोला पोलिस स्टेशनशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, सांगोला पोलिस स्टेशनचे अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची संपूर्ण माहिती घेतली. अतिशय कमी वेळात पोलिसांनी मृताची ओळख पटवली. तो खर्डी येथील संतोष चव्हाण यांचा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत संतोष चव्हाण प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक माहूरकर करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीला पकडले
संतोष चव्हाण आणि आरोपी दोघे जण मिळून परमिट रूममध्ये मद्यप्राशन करताना सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व फोनपेच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवून तांत्रिक कौशल्याच्या आधारे संशयितास अवघ्या २ तासात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नातेपुते (ता. माळशिरस) येथून सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशयित गोविंद शिंदे याने आर्थिक देवाणघेवाणच्या कारणावरून रागाच्या भरात संतोषचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले.