सोलापूरात चार पोलिसांना घेतले ताब्यात
By Admin | Updated: December 30, 2016 01:43 IST2016-12-30T01:43:46+5:302016-12-30T01:43:46+5:30
इंडेन गॅसच्या डिलिव्हरी बॉयकडून १७ लाख रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी चार पोलिसांना फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यात एका महिला

सोलापूरात चार पोलिसांना घेतले ताब्यात
सोलापूर, दि. 30 - इंडेन गॅसच्या डिलिव्हरी बॉयकडून १७ लाख रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी चार पोलिसांना फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यात एका महिला पोलिसाचा समावेश आहे. गुरुवारी बाळे येथील मांगोबा मंदिराजवळ हा प्रकार घडला. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
नेहमीप्रमाणे इंडेन गॅसचे डिलिव्हरी बॉय शिवाजी थिटे व राहुल सुरवसे हे दोघे दुचाकीवरून गॅसची रक्कम गॅस व्यवस्थापकांच्या घरी जमा करण्यासाठी जात होते. बाळे येथे पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अडवून विचारणा केली. त्याच्याकडील रोकड हिसकावून घेऊन गेले आणि संबंधित रक्कम पोलीस ठाण्यास जमा न करता खासगी ठिकाणी ठेवली.
घडलेला प्रकार डिलिव्हरी बॉय शिवाजी थिटे याने गॅसच्या मालक विद्या लोलगे यांना फोनद्वारे कळविला. त्यांनी त्या दोघांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. तक्रार दाखल झाल्यानंतर फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी त्या चार पोलिसांना ठाण्यात रकमेसह हजर राहायला सांगितले. त्यानुसार काही वेळाने पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई सचिन ठोसर, फौजदार चावडीचे पोलीस सतीश माने, पोलीस नाईक राजेंद्र खाडे, सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक वैशाली बामळे पोलीस ठाण्यात हजर झाले. या चौघांविरुद्ध रक्कम पळविल्याची तक्रार देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्या चार पोलिसांची चौकशी सुरू होती.
पैसे पोलीस ठाण्यात का जमा नाही केले ?
इंडेन गॅसच्या डिलिव्हरी बॉयकडून पोलिसांनी पैसे घेतले, मग ते पैसे पोलीस ठाण्यात का जमा करण्यात आले नाहीत ? खासगी ठिकाणी का नेऊन ठेवले? असा सवाल इण्डेन गॅस एजन्सीच्या मालक तथा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या लोलगे यांनी केला. कायद्याचे रक्षक जर भक्षक होत असतील तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे? असाही प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. जेव्हा त्यांना या सर्व प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा त्या पुण्यात होत्या. रात्री त्या सोलापुरात आल्याचे त्यांनी सांगितले.
१६ लाख दोन हजाराच्या नोटा
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रक्कमेत १६ लाख रुपये हे दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत तर १ लाख रुपये १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस आयुक्त एच. व्ही. परांडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडून त्या चार पोलिसांची चौकशी सुरू होती. हिसकावून घेतलेले पैसे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे सहायक पोलीस आयुक्त परांडे यांनी सांगितले. या प्रकरणी तपास करून त्या पोलिसांवर कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस आयुक्त एच. व्ही. परांडे यांनी लोकमतशी बोलताना सांगतले.