शहरास चार दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:43 IST2020-12-05T04:43:45+5:302020-12-05T04:43:45+5:30

पँथर्स रिपब्लिकनतर्फे गोरगरिबांना अन्नदान सोलापूर : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे प्रणेते तथा पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष, माजी मंत्री गंगाधर गाडे ...

Four days low pressure water supply to the city | शहरास चार दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

शहरास चार दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

पँथर्स रिपब्लिकनतर्फे गोरगरिबांना अन्नदान

सोलापूर : मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे प्रणेते तथा पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष, माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापुरातील पक्ष कार्यकर्त्यांनी अनाथ व गोरगरिबांना अन्नदान केले. हा कार्यक्रम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद गायकवाड, हेमंत सर्वगोड, आश्विन शेवटे, गोविंद कसबे, जलाल शेतसंदी, शशिकांत फडतरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

शिक्षक पतसंस्थेवर कारवाईची शक्यता

सोलापूर : येथील सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील गैरकारभार मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सदस्य तथा या पतसंस्थेचे सभासद सिकंदर शेख यांनी उघडकीस आणला आहे. या पतसंस्थेवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्यामराव जवंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेख यांनी याबाबतीत जिल्हा उपनिबंधकांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सदर पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्याचे जवंजाळ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस कमलाकर बनसोडे, सिकंदर शेख, अ. रहिम शेख, हनुमंत यादव, किरण सगेल, गुंडिबा हारगुडे, जयकर ठोंबरे उपस्थित होते.

---

कोरोनामुळे उरुसाचे कार्यक्रम रद्द

सोलापूर : येथील मदरसा कादरिया अशरफुल उलूमने या वर्षीचे हैदराबाद येथे होणारे उरुसाचे कार्यक्रम रद्द झाल्याची सूचना दिली आहे. यावर्षी दर्गाह हजरत सय्यद अब्दुल्लाशाह रहिमहुल्लाह नक्शाबंदी चमन यांचे होणारे उरुसाचे कार्यक्रम कोरोनामुळे रद्द झाल्याची माहिती दिली आहे. ४ व ५ रोजी हे कार्यक्रम नियोजित होते. यामध्ये पाच ठिकाणी होणाऱ्या उरुसाच्या कार्यक्रमांचा समावेश होता. या कालावधीत दर्गा शरीफ बंद असणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

---

एसटी कर्मचारी बनले स्वतःच स्वच्छतादूत

सोलापूर : एसटी महामंडळाने स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे ठरवले असून, १ डिसेंबर रोजी याचे उद्घाटन करण्यात आले. अतिशय साध्या पद्धतीने कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागात उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागात स्वच्छता करण्याला प्राधान्य देऊन स्वच्छता पंधरवड्याची सुरुवात केली. त्यांनी आपल्या विभागात सर्व कर्मचाऱ्यांसोबत सुरेशसिंग यांनी स्वच्छता करून या उपक्रमाला दुजोरा दिला.

--

सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण मेळावा पुण्यात

सोलापूर : भारत सुरक्षा सेवा आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ६ डिसेंबरला सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मेळावा आयोजित केला आहे. पुण्यातील हडपसरच्या राधाकृष्ण मंदिरात हा कार्यक्रम होईल. मुख्याध्यापिका सुभद्रा जगताप यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. माजी सैनिक एस. एस. डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. इच्छुक आणि गरजू युवकांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मेजर वाय. जी. शिंदे यांनी केले आहे.

--

विनामास्क फिरणाऱ्या १९४ जणांवर कारवाई

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विनामास्क फिरणाऱ्या १९४ जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून १९ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई बुधवारी दिवसभरात करण्यात आली. शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष नाकाबंदी करून पोलिसांनी ७१७ वाहने तपासून १९४ जणांवर विनामास्कची कारवाई केली.

--

बेशिस्त नागरिकांना ३० हजारांचा दंड

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, त्यात पुन्हा वाढ होऊ नये म्हणून विनामास्क फिरणारे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. बुधवारी महापालिकेने २९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. कन्ना चौक, नवीपेठ, पांजरापोळ चौक, माणिक चौक, विजयपूर रोड, होटगी रोड, मरिआई चौक, दत्त नगर, गुरुनानक नगर या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

--

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

सोलापूर : महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकाला गेल्या सहा महिन्यांपासून मुदतवाढ दिलेली नाही. तसेच त्यांचे वेतनदेखील दिले नाही. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे काम त्यामुळे ठप्प पडले आहे. शहरात मोकाट कुत्री चावल्याने रेबीजची लागण झाल्याने आतापर्यंत चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणाचे लक्ष नाही. त्यामुळे महानगरपालिकेने पथकाला मुदतवाढ द्यावी व कर्मचाऱ्यांचे वेतन करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केली आहे.

---

चित्रपटासाठी कलावंतांना आवाहन

सोलापूर : येथील टीएमई म्युझिकच्या वतीने मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी बाल व तरुण कलावंतांना मोफत संधी दिली जाणार आहे. कलावंतांनी त्यांचे नृत्य व अभिनयाचे व्हिडीओ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. वयोगट १८ ते २५ च्या कलावंतांना त्यामध्ये संधी दिली जाणार आहे. कलावंतांनी संस्थेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---

युनिसेफ प्रोजेक्टअंतर्गत संवाद कार्यशाळा

सोलापूर : युनिसेफ प्रोजेक्टअंतर्गत संवाद कार्यशाळा उत्तर पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच पार पडली. यासाठी मार्गदर्शक म्हणून उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शेख, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, आरोग्य अधिकारी धत्तरगी, के. एन. श्रावस्ती, ग्रामसेवक राजकुमार साबळे उपस्थित होते. उत्तर सोलापूर तालुक्यातील जवळपास २५ गावांतील बचत गटाच्या महिला अध्यक्ष, सुपरवायझर मंगला धुमाळ, शामल गुरव, अश्विनी कोरके, देवकन्या जगदाळे, काकासाहेब आडसुळे उपस्थित होते.

---

सहायक वनसंरक्षक रणदिवे यांना रजतपदक

पंढरपूर : तुंगतचे सुपुत्र गणेश रणदिवे यांना रजतपदक जाहीर करण्यात आले आहे. वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी सुवर्ण व रजत पदके देण्यात येतात. २०१८-१९ या वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गणेश रणदिवे यांना हे पदक देण्यात आले आहे.

--

हलकट्टी वीरभद्रेश्वर यात्रा रद्द

सोलापूर : कलबुर्गी जिल्ह्यातील हलकट्टी येथील श्री वीरभद्रेश्वर यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. सोलापूर येथून हलकट्टी येथील वीरभद्रेश्वर यात्रेला हजारो भाविक जात असतात. कोरोनामुळे यंदा ४ व ५ डिसेंबर रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने गर्दी होऊ नये म्हणून जमावबंदी लागू केली आहे. त्यासाठी भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन श्री वीरभद्रेश्वर मंदिर कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Four days low pressure water supply to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.