चांदणी नदीच्या पुरामुळे पाच गावचे पूल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:44+5:302021-09-14T04:26:44+5:30
बार्शी : बार्शी तालुक्यातून भोगावती, नीलकंठा, राम आणि चांदणी या चार प्रमुख नद्या वाहतात. मात्र, यंदा सर्वात चर्चेत ...

चांदणी नदीच्या पुरामुळे पाच गावचे पूल पाण्याखाली
बार्शी : बार्शी तालुक्यातून भोगावती, नीलकंठा, राम आणि चांदणी या चार प्रमुख नद्या वाहतात. मात्र, यंदा सर्वात चर्चेत राहिली आहे ती बालघाटच्या डोंगर रांगातून वाहत असलेली चांदणी नदी. या नदीच्या कॅचमेन्ट एरियात यंदा दमदार पाऊस झाल्याने नदीला पुन्हा पूर आला आहे. त्यामुळे या नदीवरील मांडेगाव, कांदलगाव, धस पिंपळगाव, देवगाव, आगळगावचे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यानिमित्ताने आता या सर्व पुलांच्या उंचीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने मांडेगावसह देवळाली, अरसोली व भूम वरून येणाऱ्या लोकांची गैरसोय झाली आहे. सध्या शेतकरी उडीद काढणीच्या कामास लागले असतानाच पावसाने जोर धरला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मांडेगावमधील ग्रामस्थांना बार्शीला जाणे मुश्किल झाले आहे. ग्रामस्थांकडून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे.
मांडेगाव येथे बाभूळगाव तलाव, मांडेगाव तलाव, बांगरवाडी तलाव या तलावांचे सांडवे सुटले आहेत. येरमाळा पश्चिम भागातील पडणारे सर्व पाणी मांडेगाव येथील पुलावरून वाहत असल्याने नागरिकांची अडचण होत आहे. याच नदीवरील धस पिंपळगाव येथे ही कायम अशीच परिस्थिती असते. खाली बार्शीहून देवगावमार्गे भूमकडे जाणारा पूलही सातत्याने पाण्याखाली जात आहे. कांदलगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून पुलावरील पाणीच कमी झाले नाही.
---
दरवर्षी पावसाळ्यात आम्हांला या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मांडेगाव येथील पुलाची उंची वाढवावी.
- पंडित मिरगणे
सरपंच
---
आमचे गावही तालुक्यातील बॉर्डरवरील गाव आहे. गावाच्या कडेला असलेल्या चांदणी नदीवरील पूल छोटा असल्याने सतत पुलावर पाणी वाहते. त्यामुळे कोणालाच बार्शीकडे येता येत नाही. परवाच एक जण वाहून जाताना वाचला आहे. या पुलाची उंची वाढवण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत.
- किरण कोकाटे
धस पिंपळगाव
---
चांदणी नदीवरील नळ्याचा पूल मोठा पाऊस पडला की पाण्याखाली जातो. त्यामुळे नदीपलीकडे जमिनी असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन खरिपाच्या सुगीत मोठे हाल होतात. परांडा तालुक्यातील सिरसाव, सोने कांदलगाव, घारगाव आदी गावातील लोकांचीही गैरसोय होते. याठिकाणी कमानीच्या मोठ्या पुलाची गरज आहे.
- प्रदीप नवले
सरपंच, कांदलगाव
----
फोटो : १३ बार्शी १
१३ बार्शी २
मांडेगाव व कांदलगाव येथील पुलावरून पाणी वाहत असलेले फोटो आहेत.