करकंबमधून भरदिवसा पळविले साडेपाच तोळे दागिन्यांसह रोकड; महिन्यात दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2023 22:07 IST2023-06-20T22:07:26+5:302023-06-20T22:07:38+5:30
मागील एक महिन्यांपूर्वी पंढरपूर - टेंभुर्णी रोडवर बाळू शिंदे यांच्या घरी भरदिवसा चोरी झाली.

करकंबमधून भरदिवसा पळविले साडेपाच तोळे दागिन्यांसह रोकड; महिन्यात दुसरी घटना
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : पंढरपूर तालुक्यात करकंब येथील अरण रोडवर जाधव वस्ती येथे मंगळवार, २० जून २०२३ रोजी सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान विकास भगवान जाधव यांचे घर फोडून चोरट्यांनी रोख दहा हजार रुपयांसह साडेपाच तोळे दागिने असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
मागील एक महिन्यांपूर्वी पंढरपूर - टेंभुर्णी रोडवर बाळू शिंदे यांच्या घरी भरदिवसा चोरी झाली. दिवसा घडलेल्या चोरीप्रकारामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार २० जून रोजी सकाळी एका लाल रंगाच्या मोटारसायकल वरून आलेल्या दोन चोरट्यांनी अरण रोडवर विकास जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले. त्यातून ३५ ग्रॅम सोन्याचे लॉकेट, पाच ग्रॅम पिळ्याची अंगठी, दहा ग्रॅम कानातील टॉप्स, पाच ग्रॅम सोन्याचे गंठण व रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय फुगारे करीत आहेत.