सोलापूर : झोपेतील नागरिकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून घरात घुसून चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन ठिकाणी साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पाच जोड चांदीचे पैंजण असा २ लाख ५० हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला.
ही घटना सोमवार, १५ एप्रिल रोजी मध्यरात्री २:३० सुमारास सांगोला तालुक्यात अकोला (लिगाडे मळा) येथे घडली. याबाबत, विक्रमसिंह विठ्ठलराव लिगाडे (रा.अकोला वासूद) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान सोलापूर येथून पाचारण केलेले श्वान दोन्ही घराच्या अवतीभवती घुटमळले. ठसेतज्ज्ञाकडून लोखंडी कपाटावरील ठसे घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी दिली.
फिर्यादी विक्रमसिंह लिगाडे व त्यांचे चुलते विष्णू लिगाडे शेजारी कुटुंबासह राहण्यास आहेत. रविवारी रात्री १० च्या सुमारास दोन्हीही कुटुंब जेवण उरकून उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले. चोरट्याने हीच संधी साधत त्यांच्या तोंडावर गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारला. विक्रमसिंह यांच्या घरात दोन चोरटे घुसले. कपाट उघडून ड्रॉवर उचकटत ३ तोळे गंठण, १ तोळे पिळ्याच्या दोन अंगठ्या, ७ ग्रॅमचे कानातील झुबे, ४ ग्रॅम ठुशी असा सुमारे २ लाख ४ हजार रुपयांचे दागिने लंपास केले.
दोन चोरटे विष्णू लिगाडे यांच्या घरात प्रवेश करून कपाटाचे ड्रॉवर उचकटून लहान मुलांच्या ४ ग्रॅम सोन्याच्या ४ अंगठ्या, ४ जोड चांदीचे पैंजण व विष्णू लिगाडे यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग पळवली.
लपलेल्या चोरट्याला पाहून आरडाओरड केली
दरम्यान पहाटे अडीचच्या सुमारास शेजारी राहणारे दाजी लिगाडे लघुशंकेसाठी उठले आणि त्यांना झाडाच्या आडोशाला चोर लपल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केली. चुलत्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून विक्रमसिंह लिगाडे यांच्या कुटुंबातील सर्वजण उठले. त्यावेळी वस्तीवरील मुले चोरांना पकडा असा आरडाओरड करत पळत सुटली होती म्हणून तेही त्यांच्या पाठीमागे पळत गेले. मात्र चोरटे खटकाळेवाडी, कमलापूर रोडने पळून गेले.