निवडणुका लढल्या आता खर्च तातडीने सादर करा अन्यथा सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST2021-03-26T04:21:54+5:302021-03-26T04:21:54+5:30
भीमानगर : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक लढवलेल्या प्रत्येक उमेदवाराने तातडीने निवडणुकीचा खर्च सादर करावा अन्यथा सहा वर्षे ...

निवडणुका लढल्या आता खर्च तातडीने सादर करा अन्यथा सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी
भीमानगर : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक लढवलेल्या प्रत्येक उमेदवाराने तातडीने निवडणुकीचा खर्च सादर करावा अन्यथा सहा वर्षे निवडणुका लढविण्यास बंदी घालण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले.
१५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ६५७ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामधून ६ हजार ३०१ उमेदवार ग्रामपंचायत सदस्य पदावर निवडून आले. यामध्ये माढा तालुक्यातील ७३८ सदस्य, पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांतील ३८७ सदस्य व माळशिरस तालुक्यातील १४ गावांतील ११२ सदस्य विजयी झाले आहेत.
गावातील प्रत्येक उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंतचा सर्व खर्चाचा तपशील ३० दिवसांच्या आत निवडणूक आयोग कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. अद्याप अनेकांनी खर्च सादर केलेला नाही. हा खर्च सादर न केल्यास विजयी उमेदवारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते तसेच भविष्यातील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही, त्यामुळे तातडीने संबंधितांनी आपला निवडणूक खर्च सादर करावा, असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.