कृषिपंप ग्राहकांनाही होणार 'नवप्रकाश' योजनेचा लाभ
By Admin | Updated: January 6, 2017 17:35 IST2017-01-06T17:35:04+5:302017-01-06T17:35:04+5:30
थकित देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची नवप्रकाश योजना १ नोव्हेंबर २०१६ पासून सुरू आहे.

कृषिपंप ग्राहकांनाही होणार 'नवप्रकाश' योजनेचा लाभ
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 6 - थकित देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणची नवप्रकाश योजना १ नोव्हेंबर २०१६ पासून सुरू आहे. या योजनेत आता कृषिपंपधारक ग्राहकांचा व न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकुमनामा (डिक्री) मंजूर झालेल्या विशिष्ट प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे.
महावितरणच्या नवप्रकाश योजनेत लोक अदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. याशिवाय न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकुमनामा (डिक्री) मंजूर होऊन १२ वर्षे झाली असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे.
नवप्रकाश योजनेत सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांचा समावेश आहे. यात थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यामध्ये विद्युत जोडणी घेताना सूट देण्यात आली असून ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीजजोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नवप्रकाश योजनेचा कालावधी ६ महिन्यांचा असून या योजनेत जानेवारी २०१७ अखेरपर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम १०० टक्के माफ होणार आहे. तर योजनेच्या फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाच्या रक्कम भरणा केल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे.
या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकबाकीच्या रक्कमेचा तपशील सहजरित्या माहीत व्हावा म्हणून महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली आहे. तसेच जेथे इंटरनेटची सुविधा नसेल अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीच्या रकमेचा तपशील महावितरणच्या शाखा कार्यालयापासून ते मंडल कार्यालयात तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.