अक्कलकोट - ऊसाचे बिल मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. २ ऑगस्टला दुपारी ४ वाजता शेतातील वस्तीवर त्याने औषध प्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारावेळी ११ ऑगस्टला सकाळी ९ वाजता त्याचा मृत्यू झाला. सुनील कुंभार असं २८ वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार, सुनील कुंभार यांनी दक्षिण सोलापूरातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याला मागील वर्षी ऊस पाठवला होता. त्याचे अद्याप बिल मिळालेले नाही. ऊस जाऊन नऊ महिने झाले तरी पैसे मिळाले नाहीत. पैशांची मागणी करूनही बिल मिळत नसल्याने २ ऑगस्टला नैराश्य येऊन त्यांनी शेतातील वस्तीवर विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर त्यांना तात्काळ सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ८ दिवसांनी ११ ऑगस्टला सुनीलचा मृत्यू झाला.
सुनील यांच्या खिशात सापडली चिठ्ठी
विष प्राशन केलेले सुनील कुंभार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सोलापूरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनाचे काम सुरू होते. सुनील यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. सुनील यांच्या भावाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात वडील, आई आहेत. सुनील अविवाहित होता, दोन बहिणी असून त्यांचे लग्न झाले आहे.
दरम्यान, मी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझा ऊस गोकुळ कारखान्याला गेला होता. त्याचे दीड लाखापर्यंत बिल आहे. वारंवार मागणी करूनही कारखान्याने बिल दिले नाही. बँक ऑफ महाराष्ट्र मैदर्गी येथून कर्ज घेतले आहे. बँक अधिकारी पैसे भरण्यासाठी तगादा लावत होते. एकीकडे कारखान्याकडून ऊसाचे बिल मिळत नव्हते, दुसरीकडे बँकेकडून कर्जाची रक्कम भरण्यासाठी तगादा सुरू होता. या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या केली आहे. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात या सर्व बाबींची नोंद आहे असं मयत सुनीलचे वडील चौडप्पा कुंभार यांनी म्हटलं आहे.