'आयडीबीआय' बँकेतील भरतीसाठी बनावट जाहिराती

By Admin | Updated: November 12, 2014 00:16 IST2014-11-12T00:02:32+5:302014-11-12T00:16:22+5:30

तरुणांकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न

Fake advertisements for 'IDBI Bank' recruitment | 'आयडीबीआय' बँकेतील भरतीसाठी बनावट जाहिराती

'आयडीबीआय' बँकेतील भरतीसाठी बनावट जाहिराती

कोल्हापूर : ‘आयडीबीआय’ बँकेत सहायक रोखपालपद आणि इतर पदांसाठी भरतीची बनावट जाहिरात आणि अपॉर्इंटमेंट आॅर्डर देण्याचा सपाटाच काही अज्ञात व्यक्तींनी लावला आहे़ रोजगारासाठी भटकणाऱ्या बेरोजगार युवकांना हेरून पैसे उकळण्यासाठी अशा प्रकारच्या बनावट जाहिराती देण्यात येत आहेत़ ‘आयडीबीआय’ बँकेने याबाबत सावधान करणारी नोटीस दिली असून, अशा कोणत्याही एजन्सीज किंवा व्यक्तीशी आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन केले आहे़
गेल्या काही दिवसांपासून आयडीबीआय बँकेत सहायक रोखपालपदाची आॅर्डर, तसेच अन्य पदांसाठी नोकरीचे आमिष दाखवणारे संदेश बेरोजगारांना पाठवले जात आहेत़ नोकरीसाठी युवकांकडून लाखो रुपयांची मागणी होत आहे़ काही सावध युवकांनी याबाबत बँकेच्या निदर्शनास ही बाब आणून देताच बँकेने अशा प्रकारच्या बोगस भरतीच्या आमिषास बळी पडू नये, तसेच नोकरी देण्याच्या आमिषाने कुणी पैशाची मागणी केल्यास पैशाचा व्यवहार करू नये, असे आवाहन केले आहे़
बँकेतील कोणतीही रिकामी जागा भरण्यासाठी बँक महत्त्वाच्या वर्तमानपत्रांत, तसेच एम्प्लॉयमेंट न्यूजमध्येच जाहिरात देते़ तसेच बँकेच्या ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉट आयडीबीआय डॉट कॉम’ या वेबसाईटवर जाहिरात देण्यात येते़ या वेबसाईटवर बँकेच्या विविध भरती संदर्भातील सूचना सविस्तर देण्यात येतात़ बँकेने किंवा प्रशिक्षणासाठी कोणतीही एजन्सी किंवा व्यक्ती नियुक्त केलेली नाही़ स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच उमेदवारांची निवड केली जाते़ त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने किंवा एजन्सीने नोकरीचे आमिष दाखवून पैशाची मागणी केल्यास त्यांच्याशी व्यवहार करू नये़ त्यास बँक जबाबदार राहणार नाही, असे या नोटिसीमध्ये नमूद केले आहे़
दरम्यान, या युवकांना बनावट भरतीस बळी पाडू पाहणाऱ्यांना या युवकांचे मोबाईल क्रमांक कोठून मिळाले? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे़ याबाबत बँकेच्या मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता, काही सजग युवकांनी बँकेशी या बोगस भरतीबाबत कळवल्यानंतर ही नोटीस दिली आहे़ बँकेच्या भरतीबाबत साधारणत: दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जाहिरात दिली जाते; पण अद्याप अशी जाहिरात दिलेली नाही़ परीक्षा आयबीपीएस घेते. त्यामुळे उमेदवाराच्या भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहाराचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती दिली़ (प्रतिनिधी)

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील विविध पदांसाठी आयबीपीएस परीक्षा घेते़ दरवर्षी डिसेंबरमध्ये ही परीक्षा होते़
रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटचा, एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर व प्रमुख वर्तमानपत्रांचा संदर्भ विश्वासार्ह
नोकरभरतीसाठी बँकांकडून कोणत्याही खासगी एजन्सीची नियुक्ती केलेली नसते़

Web Title: Fake advertisements for 'IDBI Bank' recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.