निर्यात शुल्क वाढीला सोलापुरात विरोध; 'जनहित' ने केला लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न
By Appasaheb.patil | Updated: August 23, 2023 13:05 IST2023-08-23T13:05:12+5:302023-08-23T13:05:22+5:30
केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने दर पडण्याची शक्यता आहे.

निर्यात शुल्क वाढीला सोलापुरात विरोध; 'जनहित' ने केला लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न
सोलापूर : केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने दर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यात शुल्क वाढीला विरोध करीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सकाळी जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या आंदोलनावेळी शेतकरी संघटनेने शिंदे, फडणवीस, अजित पवारांवर जोरदार टीका केली.
याचवेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यानी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. ते म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केला आहे. तो अतिशय अन्यायकारक निर्णय आहे. मागील आठ महिन्यांपासून शेतकरी कवडीमोल दरात कांदा विकत आहे. अद्यापही कांदा अनुदानही मिळाले नाही. अशा परिस्थितीत पुन्हा केंद्राने ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कांदा लिलाव होऊ देणार नाही, अशी भूमिका प्रभाकर देशमुख यांनी घेतली. याचवेळी बाजार समितीच्या गेटसमोर घाेषणाबाजी करीत गाड्या अडविल्या. बाजार समिती प्रशासनाशी यावेळी चर्चा करण्यात आली. जोडभावी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.