माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाजप प्रवेशाने सेना पोरकी

By Admin | Updated: February 3, 2017 16:59 IST2017-02-03T16:59:51+5:302017-02-03T16:59:51+5:30

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाजप प्रवेशाने सेना पोरकी

Ex-MLA Rajendra Raut's BJP enters Army Poraki | माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाजप प्रवेशाने सेना पोरकी

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाजप प्रवेशाने सेना पोरकी

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाजप प्रवेशाने सेना पोरकी
शहाजी फुरडे-पाटील - बार्शी
तालुक्यातील राजकारण हे पक्षापेक्षा आ़ दिलीप सोपल व राजेंद्र राऊत या गटाभोवतीच फिरत आहे़ ज्यावेळी राजेंद्र राऊत यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तेव्हा त्या पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नेते हे त्यांच्यासोबत येतात, हा इतिहास आहे. आजही तसेच झाले. राऊत यांच्यासमवेत त्यांचे सहकारी विश्वास बारबोले, पं़स़ सभापती व सर्व सात सदस्य, जि़प़चे सर्व पाच सदस्य, थेट निवडून आलेले नगराध्यक्ष व पालिकेचे ३२ नगरसेवक, पक्षाचे सर्व विद्यमान व आजी -माजी पदाधिकारी यांनी एकमुखाने राऊत यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे़ राऊत यांनी दुसऱ्यांदा शिवसेना सोडली आहे. शिवसेना, काँग्रेस, शिवसेना, भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे.
तालुक्यातील राजकारण हे नेहमी जिल्हा व राज्याच्या केंद्रस्थानी असते, त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली़ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेकडून होत असलेल्या अन्यायाचा पुनरुच्चार करीत तालुक्याचे माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी तालुक्याच्या विकासाचा शब्द घेत शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश करण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत़ राऊतांच्या या निर्णयामुळे तालुक्यात भाजपची ताकद वाढून यंदा कमळ उमलेल व तालुक्याच्या विकासाला केंद्र व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून चालना मिळेल़
बार्शी तालुक्याच्या राजकारणाचा विचार करता, तालुक्यात १९८५ पासून आ़ दिलीप सोपल यांचे वर्चस्व आहे. त्यांनी ८५ साली एस. काँगे्रस, ९० ला इंदिरा काँग्रेस, ९५ ला अपक्ष, ९९ व २००४ ला राष्ट्रवादी काँग्रेस, २००९ ला अपक्ष आणि आता २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आहे़ तालुक्यावर १९९५ पर्यंत आ़ सोपल यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र १९९६ ला राजेंद्र राऊत यांचा शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात उदय झाल्यानंतर विश्वास बारबोले व राजेंद्र राऊत हे सोपल विरोधी गटाचे नेतृत्व करू लागले व आ़ सोपल यांच्या ताब्यातील नगरपालिका, पं़स़सह विधानसभेतही एकदा वर्चस्व मिळवले़
राजेंद्र राऊत यांनी देखील सुरुवातीला दोन वेळा शिवसेना, पुन्हा नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेस व मागील विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण केले होते़ परंतु मागील लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पुन्हा शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. राऊत यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा तालुक्यातील शिवसेनेला वाली राहिला नव्हता तर नावालाच असलेल्या काँग्रेस पक्षाला बळ येऊन पंचायत समिती व नगरपालिकेत पक्षाला बळकटी आली होती़ तर पुन्हा राऊत शिवसेनेत गेल्यानंतर विधानसभा निवडणुकीत नव्वद हजार मते मिळाली होती, तर नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही २९ नगरसेवकांसह थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती़ तसेच पंधरा वर्षांपासून पंचायत समिती व जि़प़ वरही त्यांचेच वर्चस्व आहे़
------------------------------------
मिरगणेंच्या भूमिकेकडे लक्ष
राऊत यांच्या पूर्वीपासून म्हणजे विधानसभा निवडणुकीपासून राजेंद्र मिरगणे यांनी तालुक्यात भाजपचे नेतृत्व केले.मुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मिरगणे यांना बळ देण्याचे काम केले़ राजेंद्र राऊत व मिरगणे यांच्यात सख्य नाही. त्यामुळे भाजपचे नेते या दोघात समेट घडवून आणून तालुक्यात भाजप वाढविणार की, तालुका भाजपात पुन्हा दोन गट राहणार हे लवकरच समजणार आहे़ याबरोबरच या निर्णयामुळे शिवसेना पोरकी होणार असून राऊत यांच्यानंतर तालुका शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार हे देखील महत्त्वाचे आहे़

Web Title: Ex-MLA Rajendra Raut's BJP enters Army Poraki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.