गाळप हंगाम संपूनही कारखान्यांकडून ऊसबील मिळेना, बळीराजा करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
By विठ्ठल खेळगी | Updated: March 26, 2023 17:21 IST2023-03-26T17:21:14+5:302023-03-26T17:21:24+5:30
शेतकऱ्यांकडे उसाचे बिल न आल्यामुळे खत, बी बियाणे खरेदी, मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

गाळप हंगाम संपूनही कारखान्यांकडून ऊसबील मिळेना, बळीराजा करणार साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
सोलापूर : कमलाई, मकाई, भैरवनाथ व हिरडगाव साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे गाळप उसाचे बिल आठ दिवसांमध्ये शेतक-यांच्या खात्यावर जमा न केल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांना चार ते पाच महिने झाले. कारखान्यास ऊस गाळपासाठी घालून कमलाई,मकाई,भैरवनाथ व हिरडगाव या कारखानदारांनी एक दमडी सुद्धा खात्यावर जमा केलेली नाही. एफआरपी कायद्यानुसार गाळप ऊसाचे १४ दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर ऊसाचे बिल जमा केले पाहिजे. मात्र शेतकऱ्यांकडे उसाचे बिल न आल्यामुळे खत, बी बियाणे खरेदी, मुला-मुलींच्या लग्नाच्या तारखा जवळ आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
जर आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्तालय पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुपनवर यांनी दिला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव येडे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी बनकर, तालुका युवा अध्यक्ष कल्याण कोकरे, तालुका उपाध्यक्ष पद्माकर शिरसागर, नवनाथ कोळेकर, गणेश इवरे, धनंजय शिंदे, वैजनाथ तरंगे ,निलेश पडवळे ,प्रकाश काळे ,बाळासाहेब माने, तात्यासाहेब काळे, ॲड, नामदेव खताळ,उमेश सरडे आदी उपस्थित होते.