तब्बल सतराशे युनिटची वीजचोरी; दोघांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा
By संताजी शिंदे | Updated: October 29, 2023 13:13 IST2023-10-29T13:13:00+5:302023-10-29T13:13:14+5:30
भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अन्वये वीज चोरीचे कृत्य केले आहे, म्हणून सोलापूर तालुका पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तब्बल सतराशे युनिटची वीजचोरी; दोघांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा
सोलापूर : मीटरमध्ये छेडछाड करून १७०० युनिटची वीजचोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी दोघांविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे सहाय्यक अभियंता महेश रामचंद्र शिंदे (वय ४१, रा. हगलूर, ता.उ.सोलापूर) यानी दिलेल्या फिर्यादीवरून मच्छिंद्र जाधव (वय ३६, रा. कासेगांव, ता. द. सोलापूर) व प्रताप रावसाहेब खरे (वय ४१, रा. कासेगांव, ता.द.सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कासेगाव येथे मच्छिंद्र जाधव याने घरासमोर तारेवर आकडा टाकून १८ महिन्यात ७०० युनिट म्हणजे १२ हजार ४२० रूपयांची वीजचोरी करून महावितरणचे आर्थिक नुकसान केले. याशिवाय प्रताप खरे याने तारेवर आकडा टाकून १८ महिन्यात १ हजार युनिटची म्हणजेच ३९ हजार ३८० रूपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहेत. या दोघांविरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अन्वये वीज चोरीचे कृत्य केले आहे, म्हणून सोलापूर तालुका पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.