ंपंढरपूरात निवडणुकीचा धुराळा
By Admin | Updated: February 1, 2017 18:19 IST2017-02-01T18:19:28+5:302017-02-01T18:19:28+5:30
ंपंढरपूरात निवडणुकीचा धुराळा

ंपंढरपूरात निवडणुकीचा धुराळा
ंपंढरपूरात निवडणुकीचा धुराळा
प्रभू पुजारी : आॅनलाईन लोकमत पंढरपूर
पंढरपूर तालुक्यात कोणत्याही निवडणुका या पक्षीय पातळीवर न होता ‘पांडुरंंग’ विरुद्ध ‘विठ्ठल’ परिवारातच झाल्या आहेत़ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही या पारंपरिक दोन परिवारात होणार असल्याचे चित्र आहे़
आ़ भारत भालके, स़ शि़ वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, खा़ धनंजय महाडिक यांचा ‘विठ्ठल’ परिवार तर परिचारक समर्थकांचा ‘पांडुरंग’ परिवार या दोन परिवारातच तालुक्यातील निवडणुका होतात़
विठ्ठल परिवारात काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचा समावेश आहे तर पांडुरंग परिवारात परिचारक गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा यांचा समावेश आहे़ तालुक्यात जि़ प़ चे आठ गट आणि पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे़ १ फेब्रुवारीपासून जि़ प़ व पं़ स़ साठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे़ त्या पार्श्वभूमीवर अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरू आहे़ राष्ट्रवादीने काँग्रेसकडे ५० टक्के जागेची मागणी केली आहे़ शिवाय काळे गटाने स्वतंत्र दोन बैठका घेतल्याने आ़ भालके गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे़ आ़ भालके आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्यातील जागा वाटपाची बोलणी अद्याप सुरूच आहे़ जागा वाटप होत नसल्याने आ़ भालके गट, काळे गट आणि राष्ट्रवादी पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे़ जागा वाटपाची ही विठ्ठल परिवारातील राजकीय कोंडी आ़ भालके फोडणार असल्याचे समजते़ त्यानंतरच काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी होणार की नाही? याचे चित्र स्पष्ट होईल़ दुसरीकडे आ़ प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील गावदौरे करून उमेदवारांची चाचपणी घेत रणशिंग फुंकले आहे़ पांडुरंग परिवारही स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा, शिवसेना, आरपीआय यांना सोबत घेऊन महायुती करण्याच्या तयारीत आहे़ आ़ परिचारक किती जागा स्वत:कडे ठेवणार आणि मित्रपक्षांना किती सोडणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे़
-------------------
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीमच आहे़ त्यामुळे ही निवडणूक आ़ भारत भालके आणि आ़ प्रशांत परिचारक या दोन्ही आमदारांच्या प्रतिष्ठेची बनली आहे़ कारण या निवडणुकीवरून पुढील विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे़ त्यामुळे आ़ भालके व आ़ परिचारक हे दोघेही आपली शक्ती पणाला लावून काम करीत असताना दिसत आहेत़