सोलापूर : शिंदेसेनेत बाहेरचे लोक लुडबुड करत आहेत. त्यांच्यामुळे सोलापूर शहरात पक्षाची वाताहत झाली आहे, अशी टीका करत शिंदेसेनेचे शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे तसेच उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्यासह ११ जणांनी शिंदेसेनेतील विविध पदांचा शनिवारी राजीनामा दिला आहे. भाजप मध्ये जायचे की अन्य कुठे जायचे, याबाबत प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, अशी माहिती दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांच्यासह ११ जणांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. याबाबत कोल्हे यांना विचारले असता त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे बोट दाखवले आहे. सावंत हे पक्षासाठी चांगले काम करत होते, बाहेरच्या लोकांना त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला आहे. महेश साठे हे सोलापुरात शहरात येऊन पदाधिकाऱ्यांची निवड करायचे. निवडणुकीत तिकीट देतो, असे सांगायचे. ते लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आहेत. त्यांना शहराच्या राजकारणात यायचे काही कारण नाही. त्यांच्या विरोधात पक्षाचे वरिष्ठ नेते संजय मोरे यांच्याकडे तक्रार केल्याची माहितीही कोल्हे यांनी दिली.