शिक्षण मंडळाच्या सभापतीला हाकलले
By Admin | Updated: September 3, 2014 00:58 IST2014-09-03T00:58:11+5:302014-09-03T00:58:11+5:30
महापौरांचा संताप: पुरस्काराबाबत बैठक

शिक्षण मंडळाच्या सभापतीला हाकलले
सोलापूर : शिक्षक दिनी महापालिकेतील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराविषयी नियोजन करण्याच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या शिक्षण मंडळाचे सभापती प्रा. व्यंकटेश कटके यांना महापौर अलका राठोड यांनी हाकलून दिले.
मनपा प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे नियोजन करण्यासाठी महापौर राठोड यांनी मंगळवारी बैठक बोलाविली होती. प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे व इतर सदस्य बैठकीला आले होते. या बैठकीला सभापती कटके यांनी हजेरी लावली. त्यावर महापौर राठोड संतापल्या व तुम्ही पक्षाचा आदेश पाळलेला नाही. त्यामुळे आम्हाला पक्षाचा आदेश आहे की तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमात सामावून घेऊ नका. त्यामुळे तुम्ही बैठकीत बसू नका असे सुनावले. त्यामुळे कटके बैठक सोडून निघून गेले. त्यानंतर महापौरांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.
शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेश देणार आहेत. हा कार्यक्रम सर्व शाळांमधून दाखविला जावा अशी सूचना करण्यात आली आहे. टीव्ही, संगणक, इंटरनेट, रेडिओ माध्यमातून महापालिका हद्दीतील ३६५ शाळांमधून हे प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.
-------------------------
आदेश पाळला नाही
शिक्षण मंडळाच्या सभापतीपदाची मुदत संपल्यावरही प्रा. कटके यांनी पद सोडलेले नाही. काँग्रेस पक्षाने आदेश देऊनही त्यांनी राजीमाना न दिल्याने त्यांना कार्यक्रमात सामावून न घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कटके यांना शिक्षण मंडळाचे बजेट मांडण्याची संधी दिलेली नाही. आजही या आदेशाचा कटके यांना प्रत्यय आला.