सुक्या गवताचा तुटवडा

By Admin | Updated: November 22, 2014 00:12 IST2014-11-21T22:34:29+5:302014-11-22T00:12:08+5:30

अनियमित पाऊस : पशुपालन व्यवसायावर परिणाम

Dry grass scarcity | सुक्या गवताचा तुटवडा

सुक्या गवताचा तुटवडा

महेश चव्हाण - ओटवणे --सह्याद्री पट्ट्याच्या तळाशी राहणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जवळजवळ शंभर टक्के भातशेती कापणी पूर्ण झाली आहे. मात्र, उत्पन्नाबरोबरच गवत चाऱ्याचा विचार करता पुढील वर्षी पावसाळ्यात गवतचाऱ्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा शेतकऱ्यांना जाणवणार आहे. गवत-चाऱ्याच्या या कमतरतेमुळे पशुपालन व्यवसायावरही त्याचे विपरीत परिणाम होत असून या व्यवसायाला आता उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे.
सह्याद्री पट्ट्यातील ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाळी भातशेती करतात. पावसाळी भातशेतीवरच येथील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आर्थिक साधन आणि गुरांसाठी गवत चारा अवलंबून असतो. यावर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे उत्पन्न तर घटलेच, शिवाय गवत चाऱ्यावरही याचा वितरीत परिणाम झाला आहे. मे-जून महिन्यात जोरदार कोसळणारा पाऊस लांबणीवर गेल्याने भातशेती उशिरा झाली. त्यामुळे साहजीकच बदलत्या वातावरणामुळे त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. त्यातच गवते डोलू लागल्यानंतर लागणाऱ्या अवेळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आणि भूमिगत झालेला गवतचारा कुजून गेला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भातशेतीत मोठ्या प्रमाणात केला जातो. कमी उंचीची आणि अधिक उत्पन्न देणारी बी-बियाणी लावली जात असल्याने या शेतीत गवताचा चारा कमी मिळतो. सह्याद्री पट्ट्याच्या गावातील लोकांची भातशेती ही अधिक प्रमाणात डोंगराळ भागातच आहे. मात्र, या भातशेतीवर जंगली प्राणी तुटून पडत असल्याने या भागातील शेती करणे शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरते. त्यामुळे येथील जमिनी अधिकतर पडीकच ठेवल्या जातात. तसेच जंगली प्राणी चारासुद्धा फस्त करू लागल्याने गुरांसाठी डोंगराळ भागातील चवदार गवत मिळणे कठीण होऊन बसले आहे.
गवत हे गुरांसाठी महत्त्वाचे आणि प्राथमिक अन्न आहे. मात्र, ऐन उन्हाळी आणि पावसाच्या सुरुवातीला या गवताचा तुटवडा भासू लागतो. पुरेशा प्रमाणात गवत उपलब्ध होत नसल्याने गुरांची परवड होते. त्यामुळे गुरांना मोकाट सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. गवताच्या कमतरतेमुळे पशुपालन व्यवसायालाही आता उतरती कळा लागली आहे. याचा दुग्धोत्पादनावरही परिणाम होत आहे.

शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली
पशुपालन हा शेती व्यवसायाचा जोड धंदा. परंतु शेतीतून मिळणारे गवतच तुटपुंजे असल्याने त्याचा परिणाम पशुपालनावर होऊन गुरे मोकाट सोडण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. ही मोकाट जनावरे शहरातही दाखल होत असल्याने शहरी भागात मोकाट जनावरांची संख्या वाढू लागली आहे.

Web Title: Dry grass scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.