डॉक्टरास तीन वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: June 28, 2014 00:39 IST2014-06-28T00:39:10+5:302014-06-28T00:39:10+5:30
महिला रुग्णाचा विनयभंग : ४ हजार दंड

डॉक्टरास तीन वर्षे सक्तमजुरी
सोलापूर : उपचारासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉ. हरिचंद्र निताई बिस्वास (वय-२८, रा. भारत हौसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) यास न्यायदंडाधिकारी एस. डी. कंकणवाडी यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, १ मार्च २०१३ रोजी पीडित महिला आपल्या पतीसह उपचारासाठी डॉ. बिश्वास यांच्या मौलाली चौकातील रुपा क्लिनिकमध्ये आली. डॉक्टरांनी तिला तपासणीसाठी आत जाण्यास सांगून तिच्या पतीला आणि कंपाउंडरला बाहेर थांबण्याचा सल्ला दिला. डॉक्टराने आतून कडी लावून तिच्याशी अश्लील कृत्य सुरू ठेवले. त्यास विरोध करीत महिलेने आतून आरडाओरडा सुरू केला. कडी काढण्याचा प्रयत्न करीत असतानाही डॉक्टराने तिला विरोध केला. अखेर कसाबसा प्रयत्न करीत ‘त्या’ महिलेने स्वत:ची सुटका केली. महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. पीडित महिलेने सदर बझार पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली. महिला फौजदार एस. एम. बागवान यांनी डॉक्टरावर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या खटल्यात सरकारतर्फे अॅड. एस. डी. वरपे यांनी तर आरोपीतर्फे अॅड. आर. एन. शेख यांनी काम पाहिले.