रुग्णवाहिका अन् कारच्या अपघातात डॉक्टरांचा मृत्यू; गारवाडपाटीजवळ अपघात
By काशिनाथ वाघमारे | Updated: November 30, 2023 20:26 IST2023-11-30T20:25:30+5:302023-11-30T20:26:04+5:30
सातारा-लातूर महामार्गावर गारवाडपाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व कारच्या अपघातात एका तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला.

रुग्णवाहिका अन् कारच्या अपघातात डॉक्टरांचा मृत्यू; गारवाडपाटीजवळ अपघात
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : सातारा-लातूर महामार्गावर गारवाडपाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व कारच्या अपघातात एका तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला. वसंत भोसले (वय ३५, रा. अकलूज, ता. माळशिरस) असे मरण पावलेल्या डॉक्टरांचे नाव असून गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेदरम्यान हा अपघात झाला.
पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार अपघातातील रुग्णवाहिका (एम. एच. ११ / सी. एच. ९३२४) ही म्हसवड येथून एका रुग्ण बालकाला घेऊन अकलूजच्या दिशेने निघाली होती. गारवाडपाटी जवळ येताच मांडकीहून अकलूजकडे निघालेली कार (एम.एच. १० / बी. ए. ४३४५) यांच्यात जोरात धडक झाली. या धडकेत कारचालक डॉ. वसंत भोसले (रा. अकलूज) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मांडकी आरोग्य केंद्रावर शोककळा
डॉ. वसंत भोसले हे मांडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. मांडकी आरोग्य केंद्रावर शोककळा पसरली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून याबाबत माळशिरस पोलिसात खबर देण्यात आली आहे.