जि. प. ला महिन्यात तीन सीईओ

By Admin | Updated: June 26, 2014 01:25 IST2014-06-26T01:25:44+5:302014-06-26T01:25:44+5:30

आर. पी. झेंडे: गुडेवार यांच्या बदलीमुळे पुणे जि. प. च्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार

District Par. Three CEO in the month of LA | जि. प. ला महिन्यात तीन सीईओ

जि. प. ला महिन्यात तीन सीईओ


सोलापूर: महत्त्वाची पदे रिक्त असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेला जून महिन्यात तीन सीईओ पाहावयाला मिळाले असून, सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात अधिकारी न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे जिल्हा परिषदेला प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या आर. पी. झेंडे यांच्याकडे आता सोलापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा पदभार सोपविला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या रिक्त पदांची संख्या वरचेवर वाढत आहे. मागील वर्षी मे मध्ये ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद रिक्त झाले आहे.
हणमंत मुळूक हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिकामे झाले आहे. वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरीही हे पद भरण्यात आले नाही. ३१ मे रोजी अतिरिक्त सीईओ तानाजी गुरव हे सेवानिवृत्त होणार असल्याचे शासनाला माहीत होते. तरीही गुरव यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती केली नाही. हे पद रिक्तच ठेवले. सीईओ श्वेता सिंघल या प्रसूती रजेवर जाणार हेही नक्की होते, असे असताना अतिरिक्त सीईओ व प्रकल्प संचालक पदे रिक्त ठेवली.
त्यामुळे आता पदभार घेण्यासाठीही अधिकारी उरला नाही. १२ जूनपासून सिंघल या रजेवर गेल्याने त्यांचा तात्पुरता पदभार मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे दिला. गुडेवार यांची बदली झाल्याने आता पदभार घेण्यासाठीही अधिकारी नसल्याने थेट पुणे जि. प. च्या अधिकाऱ्याला सोलापूर जि. प. च्या सीईओचा तात्पुरता पदभार सोपविला आहे. पुणे जि. प. चे प्रकल्प संचालक आर. पी. झेंडे हे गुरुवारी सोलापूर जि. प. चे प्रभारी सीईओ म्हणून पदभार घेणार आहेत.
पुणे जि. प. चे कामकाज सांभाळून सोलापूर जि. प. चे कामकाज त्यांना करावे लागणार आहे.
-------------------------
कोण राहिला नाही वाली
पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्हा परिषदेला सक्षम व पाहिजे ते अधिकारी नियुक्त केले जातात; मात्र सोलापूर जिल्हा परिषदेला सक्षम अधिकारी आणणारे वजनदार नेतृत्व राज्याच्या मंत्रिमंडळात नाही. अनेक वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जि. प. ची महत्त्वाची पदे रिक्त ठेवू दिली नाहीत. आता सोलापूर जि. प. ला कोणीच वाली राहिला नसल्याने महत्त्वाच्या पदावरील अधिकारी नसल्याने कारभार कसाबसा सुरू आहे.

Web Title: District Par. Three CEO in the month of LA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.