जिल्हाधिकार्‍यांकडून 'झाडाझडती..!'

By Admin | Updated: November 18, 2014 14:48 IST2014-11-18T14:48:44+5:302014-11-18T14:48:44+5:30

अस्ताव्यस्त पडलेले फाईलींचे गठ्ठे अन् कार्यालयातील घाण पाहून 'हीच का पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेली स्वच्छता मोहीम' ? असा सवाल जिल्हाधिका-यांनी उपस्थित केला.

District Officer 'Jhadajadati ..!' | जिल्हाधिकार्‍यांकडून 'झाडाझडती..!'

जिल्हाधिकार्‍यांकडून 'झाडाझडती..!'

सोलापूर: सकाळचे दहा वाजलेले...जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काही ठिकाणी झाडू मारण्याचे तर काही ठिकाणी कचरा उचलण्याचे काम सुरू होते...अनेक अधिकारी जिल्हाधिकार्‍यांच्या स्वागताच्या प्रतिक्षेत होते..तेवढय़ात त्यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयात येते...गाडीतून उतरताच...'या दुचाकी गाड्या कुणाच्या'? इथं या गाड्या नकोत असा 'पहिला आदेश' त्यांनी दिला. झपझप ते आपल्या कार्यालयात गेले. पाच मिनिटात पदभार घेण्याचा 'सोपस्कार' पार पाडून त्यांनी कामाला सुरुवात करीत विविध कार्यालये पाहणी सुरू केली. अस्ताव्यस्त पडलेले फाईलींचे गठ्ठे अन् कार्यालयातील घाण पाहून 'हीच का पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेली स्वच्छता मोहीम' ? असा सवाल त्यांनी केला. 
नूतन जिल्हाधिकारी मुंडे हे सोमवारी सकाळी हुसेन सागर एक्स्प्रेसने सोलापुरात आले. शासकीय विश्रामगृहात थांबून ते १0 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी शहाजी पवार, श्रीमंत पाटोळे, उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव,जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. 
महसूल शाखेतील कार्यालयात त्यांनी एवढय़ा फाईल अशा का ठेवल्या, ए.सी. मशीनवरील धूळ किती आहे याकडे लक्ष वेधत कर्मचार्‍यांना जाब विचारला. महसूल शाखेतील कर्मचारी वाघमारे हे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी असताना ज्या टेबलवर होते ते पुन्हा त्याच टेबलवर दिसले. त्यांचे रजिस्टर, वर्क रिपोर्ट, प्रलंबित कामे जिल्हाधिकारी मुंडे यांनी तपासली. तुम्ही अजून याच टेबलवर आहात का असेही ते म्हणाले. कार्यालये स्वच्छ दिसली पाहिजे, लोकांची कामे वेळेत झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: District Officer 'Jhadajadati ..!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.