बेघर, गरीब नागरिकांना बेडशीटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:19+5:302020-12-05T04:46:19+5:30
सोलापूर : शेळगी येथील योगिराज कंठीकर मित्रपरिवाराच्या वतीने बेघर नागरिकांना बेडशीटचे वाटप करण्यात आले. तसेच अन्नदानाचा उपक्रम पार पडला. ...

बेघर, गरीब नागरिकांना बेडशीटचे वाटप
सोलापूर : शेळगी येथील योगिराज कंठीकर मित्रपरिवाराच्या वतीने बेघर नागरिकांना बेडशीटचे वाटप करण्यात आले. तसेच अन्नदानाचा उपक्रम पार पडला. सध्या शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे बेघर नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर चिन्ना स्वामी, सागर वळसंगकर, शंकर रोनद, श्रीकांत वळसगकर, सोमेश मठपती, चंद्रकांत कलशेट्टी, विजय हवले, यश रोडगीकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. शहरातील सिद्धेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, भवानी पेठ येथील गरिबांना अन्नदान करण्यात आले. यावेळी सचिन वळसंगकर , बसवराज चडचणकर, अक्षय रोनद, नागेश गुंडेली, सोमनाथ हिंगमिरे, किरण मोरे उपस्थित होते.
--
३१ डिसेंबरपर्यंत ऑपरेशन मुस्कान शोध मोहीम
सोलापूर : विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग - महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशावरून राज्यभरासह सोलापूर शहर, जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत ‘ऑपरेशन मुस्कान’ ही शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये शहरातील सात पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी तीन महिला कर्मचारी, महिला कक्षाकडील पाच महिला कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर व चार महिला कर्मचारी असे सर्व मिळून ३० पोलीस कर्मचारी यांचे मुस्कान पथक तयार करण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त करून या बालकांचा शोध घेणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर, चाइल्ड लाईन्सचे लक्ष्मण दुधाळे, स्वप्निल शेट्टी, आनंद ढेपे, मल्लिनाथ तमशेट्टी उपस्थित होते.
--
नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
सोलापूर : शैक्षणिक वर्ष २०२० साठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे सुरू होणाऱ्या तीन वर्षे मुदतीच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणासाठी महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिसेविका कार्यालयात ७ डिसेंबरपर्यंत प्रवेश अर्ज मिळतील. ८ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत दिली आहे. बारावी (शास्त्र शाखा) उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र असतील. यासाठी एकूण २० जागा आहेत.
---
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पासेस देणार
सोलापूर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी सूचना केली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांनी विचारपूर्वक व धैर्याने वागावे. तसेच घरी राहूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम घेण्याबाबत परवानगी असणार नाही. अभिवादन करण्यासाठी संस्था, संघटना यांच्या प्रत्येकी ५ प्रतिनिधींना परवानगी मिळेल. यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनमार्फत समन्वय साधून पासेस घेणे बंधनकारक राहील, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे केले आहे.
---
कांद्याचे दर गडगडले
सोलापूर : कांद्याच्या दरात प्रतिक्विंटलमागे सरासरी ५०० ते ८०० रुपयांनी घसरण झाली आहे. गुरुवारी, सोलापूर बाजार समितीत ९५ ट्रक कांद्याची आवक झाली. दर प्रतिक्विंटल २०० ते ४ हजार ७०० रुपयांपर्यंत आहेत. सरासरी प्रतिक्विंटल २१०० रुपयांनी कांदा विकला जात आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात सर्वत्र कांदा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये होणारी आवकही सध्या कमीच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजार समितीत दररोज १५० ते २०० ट्रक कांद्याची आवक कमी होत आहे. मध्यंतरी दरात वाढ झाली होती. प्रतिक्विंटल १० हजार रुपयांपर्यंत कांद्याचा दर पोहोचला होता. त्यानंतर मात्र, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
--
थंडी वाढल्याने त्रस्त
सोलापूर : शहरात सध्या थंडी वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कमाल तापमान १५.१ अंशापर्यंत घसरले आहे. त्यामुळे सध्या शहरवासीय चांगलेच गारठले आहेत. दिवाळीत गायब झालेली थंडी मागील दोन दिवसांपासून पुन्हा वाढली आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होती.
---
६५८ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींची प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्या वर्षात (२०२१) राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायती निवडणुकीस पात्र आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वीच प्रभाग रचना, वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. १ ते ७ डिसेंबरपर्यंत मतदार यादीतील चुकांबाबत हरकत घेण्यास मुदत देण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
---
--
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा
सोलापूर : सध्या पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांबरोबर केंद्र सरकारने त्वरित चर्चा करावी, त्यांचे प्रश्न सोडवावेत व शेतकरी विरोधी तयार करण्यात आलेले तीन जाचक कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. खतीब वकील, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदने, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री सागर पाटील, रहीम शेख, बाबा सगरी जाफर मदनी, जैनुद्दीन शेख उपस्थित होते.
--
अण्णाभाऊ साठे जन्मशतक महोत्सव
सोलापूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, जय मल्हार चौक येथे अण्णाभाऊ साठे जन्मशतक महोत्सवानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पार्श्वगायक मिलिंद शिंदे उपस्थित होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, सुहास शिंदे, गणेश पुजारी, नाना कदम, बबन शिंदे, जावेद पटेल, विश्वास शिंदे, नागेश पाटोळे, महेश भिसे, सोमनाथ चव्हाण, सोपान शेख, ऋषिकेश शिंदे, यश शिंदे, नाना लोंढे, बाळासाहेब रास्ते, सहदेव वायदंडे, राम भडकरवार, लालू भडकवाड, दामोदर रणदिवे, राम शिंदे, उमेश रणदिवे उपस्थित होते.
--
जागतिक अपंग दिनाचा कार्यक्रम
सोलापूर : जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त निवासी अंधकार्यशाळेत दृष्टीबाधित विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पालकांना धान्य देण्यात आले. त्यांना आरोग्य व कोरोनाबद्दल समुपदेशन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये प्रथम शिवकुमार पाटील व द्वितीय क्रमांक नितीन हुंडेकरी यांनी मिळवला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यश केमिकल्सचे चेअरमन जयपाल महिंद्रकर, कार्यशाळेचे अधीक्षक देवेंद्र भंडारी, रामचंद्र कुलकर्णी, ॲड. रियाज मुल्ला, एजाज शेख, गणी गोलंदाज उपस्थित होते.
--
महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपक्रम
सोलापुर : महापरिनिर्वाण दिनी कबीरा सोशल फाउंडेशन सोलापूरने ‘एक पत्र बाबासाहेबांना’ या अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पत्रपेटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये बाबासाहेबांना अभिवादनपर किंवा आपल्या भावनांना पत्रातून वाट मोकळी करावी. यासाठी पत्र लिहुन पत्र पाठविण्याचे आवाहन संस्थापक सत्यजित वाघमोडे यांनी केले आहे.
---
लोध लोधा लोधी समाजाची बैठक
सोलापूर : येथील लोध लोधा लोधी समाज संघटनेची बैठक पार पडली. समाजाचे अध्यक्ष भगतसिंग जगतसिंग कल्लावाले हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी शैक्षणिक, विद्यार्थी, कामगार कल्याण, बालकल्याण, महिला उद्योग, महिला बचत गट, क्रीडा, आरोग्य व्यसनमुक्ती, ग्रंथालय, युवा एकता, जनकल्याण व राणी अवंतीबाई लोधी जयंती उत्सव समिती स्थापन करण्याचे ठरले. त्यासाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत. बैठकीसाठी समाजाचे उपाध्यक्ष सीताराम लंगडेवाले, किसनसिंग लंगडेवाले, सोबुराव शिवसिंगवाले, बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष घनशाम शिवसिंगवाले, किसनसिंग लंगडेवाले, वनशितलादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रणजितसिंग दवेवाले उपस्थित होते.
---
माकडाने घेतला बालकाचा चावा
बार्शी : पांगरी येथे माकडाच्या पिलाने धुमाकूळ घातला असून गावातील अनेक बालकांना त्याने चावा घेऊन जखमी केले आहे. सचिन थोरात, आसावरी बालाजी ठोंबरे ( वय १० महिने ), शंभू धनंजय गाढवे या तीन बालकांना माकडाने चावा घेतला आहे. वनपाल रवींद्र गवांडे, वनरक्षक करामत अली शेख हे माकडास पकडण्यासाठी आले होते; मात्र त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. गावातीलच सुधीर माने या तरुणाने माकडास गाडीवर बसवून घेऊन येडशीच्या घाटात नेऊन सोडले.
---
स्मारकासाठी जागा देण्याची मागणी
सोलापूर : सांगोला शहरात शहीद स्तंभ, स्मारक उभारण्याकरिता जागा मिळावी याकरिता नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शहरात शहीद स्तंभ स्मारक असल्याने त्या शहराच्या सौंदर्यात भर पडलेली असून व ते शहीद स्मारक उभारणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असून त्यानिमित्त देश अभिमानाची भावना अधिकाधिक जागृती होईल, शहीद स्तंभ उभारणीकरिता जागा उपलब्ध करून दिल्यास अशोक कामटे संघटना त्याच्या उभारणीस संपूर्णत: सहकार्य करेल शहीद स्तंभ स्मारकास जागा नगरपालिकेने आरक्षित केलेल्या ठिकाणी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली, असे संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकाध्ये नमूद केले आहे.
---