शेतीपंप वीजबिल वसुलीसाठी नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:38+5:302021-08-21T04:26:38+5:30
वीज वितरण कंपनीने कृषिपंप वीजबिल वसुलीसाठी चक्क ब्रह्मपुरी येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रामधून होणारा विद्युत पुरवठाच खंडित केल्याने भीमा ...

शेतीपंप वीजबिल वसुलीसाठी नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडित
वीज वितरण कंपनीने कृषिपंप वीजबिल वसुलीसाठी चक्क ब्रह्मपुरी येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रामधून होणारा विद्युत पुरवठाच खंडित केल्याने भीमा नदीकाठ व बोअरवरील सर्व कृषिपंप सध्या बंद आहेत. सध्या ऊस लागवड हंगाम व कांदा लागवड सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उसाचे बेणे अंथरून ठेवले आहे. मात्र कृषिपंप बंद असल्याने शेतात अंथरलेले उसाचे बेणे वाळून जात असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कांदा लागवड हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप विकत घेऊन ठेवले आहे. मात्र वाफ्यात पाणीच नाही, तर रोप कसे लावायचे? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.
वीज वितरणने कुठलेही लेखी परिपत्रक न काढता वीजबिल वसुली चालू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मार्च-एप्रिल महिन्यात काही रक्कम वीज बिलापोटी भरली आहे. पुन्हा वीज बिलापोटी रक्कम भरावी, असा आग्रह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा आहे. ऊसबिले अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. यातच वीज वितरणने वीज उपकेंद्रामधूनच वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना मानसिक धक्का दिला आहे.
कोट :::::::::::::::
कारखान्यांनी ऊस बिलाची एफआरपीची पूर्ण रक्कम न दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडी शेतकऱ्यांकडून पठाणी वसुली करीत आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल.
- युवराज घुले
जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कोट :::::::::::::::::::::
शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी विद्युत पुरवठा बंद केला आहे. वसुलीसाठी वरून आम्हाला प्रेशर आहे. वसुली न केल्यास कारवाई होत आहे. शेतकऱ्यांनी पूर्वी पाच हजार रुपये भरले असल्यास आणखी पाच हजार रुपये भरावेत. ज्या शेतकऱ्यांनी काहीच भरले नसल्यास त्यांनी दहा हजार रुपये भरावेत. सर्व शेतकरी बागायतदार असल्यामुळे थकित बिले भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे.
- भगवान अलदर,
कनिष्ठ अभियंता, वीज वितरण ग्रामीण विभाग
ओळी :::::::::::::::::::::::::
वीजपुरवठा खंडित केल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांनी अंथरलेल्या उसाच्या कांड्या वाळून जात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
200821\img-20210819-wa0030.jpg
विज पुरवठा खंडीत केल्याने पाण्याअभावी शेतकर्यांनी अंथरलेल्या ऊसाच्या कांडया वाळून जात असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.