भक्तीचा मळा फुलला !

By Admin | Updated: July 29, 2014 01:20 IST2014-07-29T01:20:32+5:302014-07-29T01:20:32+5:30

पहिला श्रावणी सोमवार : योगसमाधीस फुलांची सजावट

Devotee flourished! | भक्तीचा मळा फुलला !

भक्तीचा मळा फुलला !


सोलापूर : श्रावण मासातील आज पहिला सोमवार. भल्या पहाटेपासून ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांचे पाय घराबाहेर पडले. दर्शन घेण्यासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. पहिल्याच सोमवारचा मान म्हणून बापूसाहेब करजगीकर यांच्या कुटुंबीयांतर्फे योगसमाधीस आकर्षक फुलांची सजावट केली होती.
पहाटे ५ वाजता काकडा आरतीने धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता योगसमाधीची विधिवत पूजा करण्यात आली. योगसमाधीस सजावण्यात आलेल्या आकर्षक फुलांमुळे वातावरण टवटवीत बनले होते. सकाळी साडेदहा वाजता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आरतीचा कार्यक्रम पार पडला. आरती सोहळ्यात हजारो भाविक सामील झाले होते. सकाळच्या आरतीनंतर पुन्हा सायंकाळी ४ वाजता ‘श्री’ची आरती करण्यात आली. रात्री १० वाजता शेजारतीने दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमांचा समारोप झाला.
मध्यरात्रीनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळत असतानाही शेळगी, दहिटणे, सोरेगाव, मजरेवाडी, कुमठे, होटगी, बाळे, शिवाजी नगर, केगाव या दूरवरचे भाविक पहाटे एक-दीडनंतर स्नान आटोपून घराबाहेर पडले ते पायीच. पहाटे पाच-साडेपाचपर्यंत झुंडीने भाविक श्री सिद्धेश्वर मंदिरात येताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले होते. दर्शन सुलभ व्हावे म्हणून देवस्थान पंचकमिटीने महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा केल्या होत्या. मंदिराच्या सभामंडपात भजनाचा कार्यक्रमही रंगला होता.
-------------------------------
परिवहनची भक्ती सेवा
संपूर्ण श्रावण महिन्यात सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते. दूरवर राहणाऱ्या भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे जादा गाड्या सोडण्यात आल्याचे सभापती आनंद मुस्तारे यांनी सांगितले. ७, ८, २२, २४ आणि ४७ या मार्गांवरील भाविकांना आता दर्शन सुलभ होणार आहे.
-------------------------------
पोलिसांचा बंदोबस्त
फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी मंदिर आणि परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे. दर्शन रांगेत मध्येच कुणी घुसणार नाही, याची काळजीही पोलिसांकडून घेतली जाते. भाविकांच्या वाहनांसाठी होम मैदानावर स्वतंत्र पार्किंग उभे करण्यात आले आहे.

Web Title: Devotee flourished!