देव भक्तांसंगे खेळला

By Admin | Updated: July 5, 2014 00:07 IST2014-07-05T00:07:13+5:302014-07-05T00:07:13+5:30

गोल रिंगण: चैतन्यमयी माऊलींचा सोहळा माळशिरसमध्ये दाखल

Dev played bhaktansang | देव भक्तांसंगे खेळला

देव भक्तांसंगे खेळला

 माळशिरस:
लाखो वैष्णवांचे आसुसलेले डोळे, टवकारलेले कान, माऊली माऊलीच्या आरोळ्या, प्रोत्साहनपर टाळ्या अन् टाळ-मृदंगाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात दोन अश्वांचा पाठशिवणीचा खेळ पाहून अवघा वैष्णव मेळा चैतन्यमय झाला. हा चैतन्यमय सोहळा गुरुवारी रात्री माळशिरसमध्ये दाखल झाला.
नातेपुते ते माळशिरस या वाटचालीत आजचे गोल रिंगण हेच वैशिष्ट्य होते. अवघ्या सोहळ्याला त्याची उत्सुकता लागली होती. सदाशिवनगरचे मैदान भाविकांनी फुलून गेले होते. साडेबारा वाजता माऊलींचा अश्व त्यापाठोपाठ दिंड्या आणि १२.५० वाजता माऊलींची पालखी रिंगणस्थळी दाखल झाली.
मध्यभागी पालखी विराजमान झाल्यावर शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, जि. प. माजी सदस्या पद्मजादेवी मोहिते-पाटील यांनी पालखीची पूजा करून दर्शन घेतले. तोपर्यंत राजाभाऊ चोपदार, उद्धव चोपदार एकेक दिंडी रिंगणात सोडत होते. पताकाधारींनी माऊलींभोवती कडे केले होते. रामभाऊ चोपदार व बाळासाहेब चोपदार यांनी रिंगण लावले. मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर यांनी रिंगणाची पाहणी केली. राजश्री जुन्नरकर व लता इनामदार या कलावंतांनी धावपट्टीवर रांगोळ्या काढल्या. रिंगणाची तयारी पूर्ण होताच भोपळे दिंडीच्या पताकाधारींनी एक फेरी मारली. चोपदारांनी अश्वांना मार्ग दाखविला. पुढे स्वाराचा आणि मागे माऊली असे अश्वांना धावपट्टीवर सोडण्यात आले. दोन्ही अश्वांनी बेभान होऊन धावण्यास सुरुवात केली.
पहिल्याच फेरीत माऊलींच्या अश्वाने स्वाराला मागे टाकून शर्यत जिंकली आणि धाव चालूच ठेवली. त्यावेळी टाळ-मृदंगाचा निनाद, टाळ्या आणि माऊली माऊलीच्या आरोळ्या सुरू होत्या. बेभान धावणाऱ्या अश्वांनी सहा फेऱ्या केव्हा पूर्ण केल्या हे वैष्णवांना कळलेदेखील नाही. प्रत्यक्ष देव आपल्यासंगे खेळल्याच्या भावनेने वारकऱ्यांनी अश्वांच्या टापाखालची माती कपाळी लावून काहींनी लोळण व लोटांगण घातले. त्यानंतर दिंड्यांमध्ये विविध खेळ रंगले. शेवटी उडीच्या खेळानंतर चैतन्यमय झालेला सोहळा नाचत नाचतच पुरुंदावडे येथे विसाव्याला आला. घटकाभराच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा रात्री माळशिरसमध्ये विसावला.
-------------------------
‘आनंद तेथे जो मुखयाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळा, पांगुळ्या पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरुण रे’ याप्रमाणे वारकरी रिंगणाचा आनंद लुटतात.
- बाळासाहेब चोपदार
रिंगणात देवाचा खेळ पाहून अतिशय आनंद झाला. तो आम्ही फुगड्या, लोळण, लोटांगण, पाऊली आदी खेळ खेळून साजरा केला.
- चंदाताई तिवाडी
या सोहळ्यातील पहिले रिंगण असल्याने त्याची उत्सुकता होती. लाखो नेत्र यासाठी आसुसलेले असतात. वैष्णव धर्मात देवाच्या खेळाला उपमा देता येत नाही. देवाबरोबर फिरून आम्ही आमचा आनंद साजरा करतो.
- ह.भ.प. राणू महाराज वासकर

Web Title: Dev played bhaktansang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.