आषाढीत फोटो व्यवसायाला मंदी
By Admin | Updated: July 8, 2014 01:15 IST2014-07-08T01:15:02+5:302014-07-08T01:15:02+5:30
फोटो व्यवसायासह विविध व्यवसायावर मंदीचे सावट

आषाढीत फोटो व्यवसायाला मंदी
पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विविध लहान मोठे व्यवसाय सुरू असले तरी फोटो व्यवसायासह विविध व्यवसायावर मंदीचे सावट असल्याचे चित्र सध्या पंढरपूरमध्ये पाहावयास मिळत आहे.
आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये विविध देवतांचे फोटो विक्रीची जवळपास ५० ते ५५ दुकाने थाटली आहेत. फोटो विक्रीमधून आषाढी यात्रा कालावधीमध्ये जवळपास २० ते २५ लाखांची उलाढाल अपेक्षित असते. पंढरपूर शहरामध्ये फोटो तयार करून विक्री करणारे ४ ते ५ व्यावसायिक आहेत. परंतु यात्रेमध्ये थोडीफार गुंतवणूक करून काहीतरी कमाई होईल, या आशेने छोटीछोटी दुकाने थाटली जातात. यातूनच सोलापूर, इंदापूर, तुळजापूर, जेजुरी, पुणे आणि गुजरातमधून फोटो व्यावसायिक पंढरीमध्ये दाखल झाले आहेत.
यामध्ये गुजरातमधून आलेल्या व्यावसायिकांकडे प्लास्टिक बॉक्स फे्रेम असणारे व त्यामध्ये विद्युत रोषणाई केलेले फोटो आकर्षक दिसत आहेत, परंतु सलग तीन वर्षे असणाऱ्या दुष्काळामुळे व अद्यापपर्यंत पावसाने दाखविलेली हुलकावणी फोटो व्यावसायिकांसाठी अडचणीचा मुद्दा ठरत आहे. फोटोच्या दुकानामध्ये १० रूपयांपासून ५०० रूपये किमतीचे फोटो दिसून येत आहेत. परंतु यामधून २० ते ४० रूपये किमतीच्या फोटोंना यात्रा कालावधीमध्ये जास्त मागणी असते. पंढरपूरमधील स्थानिक असणाऱ्या व्यावसायिकांनी नेहमीच्या १ लाख ते दीड लाखापर्यंत असणाऱ्या भांडवलामध्ये यात्रेसाठी दुपटीने वाढ केली आहे.
-----------------------------
वारकऱ्यांची धारणा
राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीला विठ्ठल दर्शनासाठी आलेले प्रत्येक वारकरी पांडुरंगाची आठवण म्हणून एकतरी फोटो घरी घेऊन जावे, अशा प्रकारची धारणा असते.
------------------------------
पंढरपूरला पायी चालत येणारे वारकरी सर्रास शेतकरी कुटुंबातील असतात, परंतु गत तीन वर्षांपासून असलेला दुष्काळ व जुलै महिना सुरू झाला तरीही पावसाचा पत्ता नाही. यामुळे सर्रास वारकरी पैसे खर्च करताना हात आखडता घेत आहेत. आषाढी वारीसाठी तीन वर्षे फोटो व्यावसायिकांसह इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
- अर्जुन चव्हाण
फोटो विक्रेते