कर्जमाफीची रक्कम त्वरित जमा करा अन्यथा भीमा तीरावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST2020-12-11T04:49:11+5:302020-12-11T04:49:11+5:30
कुरूल : भीमा नदीला गेल्यावर्षी आलेल्या महापुरामुळे मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे नुकसान ...

कर्जमाफीची रक्कम त्वरित जमा करा अन्यथा भीमा तीरावर आंदोलन
कुरूल : भीमा नदीला गेल्यावर्षी आलेल्या महापुरामुळे मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने या बाधित शेतकऱ्यांसाठी लाख रुपये कर्जमाफी जाहीर केली होती. यंदाही अतिवृष्टी झाली. तरीही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. ती शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी अन्यथा भीमा तीरावर आंदोलन करण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.
याबाबत पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना भेटून निवेदन दिले आहे. पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे व बागांचे नुकसान होऊन मुकी जनावरेही मृत्युमुखी पडली. शासनाने मदत जाहीर करूनही कर्जमाफी व नुकसानभरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही. तसेच फडणवीस सरकारच्या काळातील पंढरपूर तालुक्यामधील ३,३०० शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे नवीन कर्ज घेणे अडचणीचे झाले आहे. याबाबत सहकारमंत्री व सहकार आयुक्त यांनी यात लक्ष घालावे, अशीही मागणी केली.
मोहोळ तालुक्यातील गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसात कोन्हेरी येथील ५८ शेतकऱ्यांनी फळबागांची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. याबाबत मोहोळ तहसीलदारांनी या बाधित शेतकऱ्यांना व जनहित शेतकरी संघटनेला चार महिन्यांपूर्वी पैसे महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो, असे आश्वासन दिले होते. ते त्वरित जमा करावे. अन्यथा पंढरपूर येथील भीमा नदी काठावर पुंडलिक मंदिराजवळ बेमुदत धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिला.
यावेळी राजाभाऊ हबाळे, चंद्रकांत निकम, श्रीकांत नलवडे, सुरेश नवले, विकास जाधव, सुभाष शेंडगे, कुमार गोडसे, नाना मोरे, मारुती भुसनर उपस्थित होते.
----