पंढरपूरच्या खण राखीला देशभर मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:58+5:302021-08-21T04:26:58+5:30
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा धुमाकूळ घातल्यानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या आशा पुन्हा धूसर झाल्या. अशातच अवघ्या काही ...

पंढरपूरच्या खण राखीला देशभर मागणी
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा धुमाकूळ घातल्यानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या आशा पुन्हा धूसर झाल्या. अशातच अवघ्या काही महिन्यांवर रक्षाबंधन सण येऊन ठेपल्याने तिने पारंपरिक पंढरपुरी राख्या बनविण्याचा निर्णय घेतला. या राख्या बनविताना त्या राख्यांना आधुनिक पद्धतीचा टच न देता साधा चोळीचा खण, लाल धागा, मणी आदी किरकोळ साहित्याचा वापर करून खणचोळी नावाची आकर्षक राखी बनवून इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली. लॉकडाऊनच्या काळात दुकानात जाऊन राखी खरेदी करणे शक्य नाही. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणेही शक्य नसल्याने इन्स्टाग्राम पेजवर पंढरपूरच्या खण राखीला लाखो जणांनी लाइक करून मागणी केली आहे. त्यामुळे ही राखी महाराष्ट्रातील कोल्हापूर, मुंबई, पुणे, ठाणे, पंढरपूरसह हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली आदी देशभरातील मोठ्या शहरांत तिने कुरिअरद्वारे राख्या पाठविल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग शिक्षणाबरोबर उद्योग, व्यवसायासाठी कसा करता येतो, याचे उत्तम उदाहरण वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीने समाजासमोर ठेवला आहे.
खणचोळी व पंढरपूर नावामुळे देशभर मागणी
देशभरातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरला येतात. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणचे चोळीचे खण, बांगड्या, प्रसादाचे साहित्य, मूर्ती, फोटो आदी साहित्य आवडीने लोक आपल्या गावी घेऊन जातात. मात्र गेल्या दीड वर्षांपासून इच्छा असूनही अनेक भाविकांना पंढरपूरला येता आले नाही. मात्र जे पंढरपूरला येऊन घेऊन जातात तेच ऐन रक्षाबंधनच्या मुहूर्तावर खणचोळीला पारंपरिक टच देऊन बनविलेली राखी इन्स्टाग्राम पेजवर शेअर करताना दिलेले पंढरपुरी खणचोळी हे नाव यामुळे ही राखी अवघ्या काही क्षणांत देशभर प्रसिद्ध झाली असल्याचे पायल पवार हिने सांगितले.