नेपतगावच्या ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:13+5:302021-02-05T06:46:13+5:30

नेपतगाव (ता. पंढरपूर) येथील कोंबड्या मारताना पशू वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी. ---- पंढरपूर : कोरोनाच्या पाठोपाठ बर्ड फ्लूने ...

The death of 'those' hens from Nepatgaon is due to 'bird flu' | नेपतगावच्या ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच

नेपतगावच्या ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच

नेपतगाव (ता. पंढरपूर) येथील कोंबड्या मारताना पशू वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.

----

पंढरपूर : कोरोनाच्या पाठोपाठ बर्ड फ्लूने जिल्ह्यात पाय पसरायला सुरुवात केली आहे. जंगलगीनंतर नेपतगाव येथेही १३० कोंबड्या दगावल्या. त्याचा अहवाल भोपाळ प्रयोगशाळेतून प्राप्त झाला असून, या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत आगामी सहा महिने कोंबड्या पाळू नये, अशा सूचना ग्रामस्थांना केल्या आहेत.

जंगलगी येथील कोंबड्या दगावल्यानंतर प्रशासनाने तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. त्यानंतर नेपतगावामध्येही हा प्रकार घडला. दि. २३ ते २७ जानेवारी या कालावधीत अचानकपणे कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे पंढरपूर तालुक्याला ‘बर्ड फ्लू’चा धोका निर्माण होऊ नये यासाठी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आणि तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. भिंगारे यांनी तातडीने सर्व पोल्ट्री फार्मधारकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. सर्व ग्रामसेवक, तलाठी, ग्राम सुरक्षा समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि पशू पालक यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. येथील एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अतिदक्षतेचा उपाय म्हणून पुढील ९० दिवस कोणीही कोंबड्या पाळू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच १० किलोमीटर परिसरात पक्ष्यांचा मृत्यू होतो का ? याकडे लक्ष ठेवण्याचे काम सुरू असल्याचे तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. भिंगारे यांनी स्पष्ट केले.

----

३५० कोंबड्या मारल्या

कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू' मुळेच झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त झाला. तातडीने खबरदारी म्हणून ‘बर्ड फ्लू’चा अधिक प्रसार वाढू नये यासाठी प्रशासनाने नेपतगावातील कोंबड्यांचा मृत्यू झालेल्या एक किलोमीटरच्या परिसरातील ३५० कोंबड्या मारल्या आहेत, अशी माहिती तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. भिंगारे यांनी दिली.

----

Web Title: The death of 'those' hens from Nepatgaon is due to 'bird flu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.