धाकटा राजवाड्यात एकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 3, 2014 01:23 IST2014-07-03T01:23:51+5:302014-07-03T01:23:51+5:30
तरुण होरपळला : शॉर्टसर्किटने घरही पेटले

धाकटा राजवाड्यात एकाचा मृत्यू
सोलापूर : कोंतम चौकातील धाकटा राजवाड्यात शॉर्टसर्किटने घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर घरात बसलेला यल्लप्पा आप्पा गायकवाड (वय ३०) हा होरपळून मरण पावला. आज (बुधवारी) सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला.
यल्लप्पा आप्पा गायकवाड हा सकाळी साडेदहा वाजता जेवण करीत बसला होता. त्यावेळी त्याची आई घराबाहेर बसली होती तर भाऊ मासळी विकण्यासाठी बाहेर गेला होता. स. १०.३० ते ११ च्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आगीच्या ठिणग्या पडू लागल्या. म्हणता म्हणता आग पसरली. यल्लप्पाला काय करावे सुचेना. त्याला घराबाहेर पडता न आल्याने तो पूर्णत: भाजला गेला. घटनेचे वृत्त समजताच जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हवालदार राठोड यांनी तातडीने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आग विझविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आग भडकली होती. या आगीत घरातील पलंग, कपडे, धान्य, दूरदर्शन संच आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.