दानम्मादेवी यात्रेला गुड्डापुरात सुरूवात
By Admin | Updated: November 22, 2014 00:10 IST2014-11-21T21:42:08+5:302014-11-22T00:10:36+5:30
भाविकांची गर्दी : कार्तिकोत्सव, पालखी उत्सव साजरा

दानम्मादेवी यात्रेला गुड्डापुरात सुरूवात
जत : तालुक्यातील गुड्डापूर येथील दानम्मादेवी यात्रेस आज (शुक्रवार) पासून प्रारंभ झाला. यात्रा तीन दिवस चालणार आहे. आज सायंकाळी कार्तिकोत्सव व पालखी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार विलासराव जगताप, आमदार लक्ष्मण सवदी (अथणी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यात्रेसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत आले आहेत. या भाविकांच्या भोजनाची सोय रस्त्यात ठिकठिकाणी तेथील नागरिकांनी केली आहे. कर्नाटक राज्याच्या सीमेपासून गुड्डापूरपर्यंत येणारे सर्वच रस्ते खराब असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.
देवस्थान समितीच्यावतीने व इतर नागरिकांनी यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत जेवणाची सोय केली आहे. याशिवाय व्यापारी आणि भाविकांसाठी पाणी, आरोग्य, दिवाबत्ती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात्रेत मेवा-मिठाई, खेळणी, पाळणे व करमणुकीच्या साधनांची दुकाने थाटली आहेत. महाराष्ट्रातील जत, सोलापूर व कर्नाटकातील अथणी, तिकोटा, विजापूर येथून जादा एसटी बसेसची सोय प्रवासी भाविकांना ये-जा करण्यासाठी करण्यात आली आहे.
शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता काशी जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांच्याहस्ते दानम्मादेवीच्या शिखरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे. कर्नाटकचे फलोत्पादनमंत्री शामनुरू शिवशंकरेप्पा, पाटबंधारेमंत्री एम. बी. पाटील व वीरण्णा अथणी उपस्थित राहणार आहेत.
यात्रा कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्वच खासगी वाहनांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे. यात्रा कालावधित वीज वितरण कंपनीने वीज भारनियमन करू नये, अशी मागणी देवस्थान समिती अध्यक्ष चंद्रशेखर पुजारी आणि संचालक सी. आर. गोब्बी यांनी केली आहे. (वार्ताहर)
गुड्डापूर येथील दानम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांनी यात्रेला हजेरी लावली आहे.