तलवारीने केक कापणे पडले महागात; अक्कलकोटमध्ये जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST2021-07-27T04:23:46+5:302021-07-27T04:23:46+5:30
अक्कलकोट : मातनहळळी येथे एका तरुणाचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

तलवारीने केक कापणे पडले महागात; अक्कलकोटमध्ये जणांविरुद्ध गुन्हा
अक्कलकोट : मातनहळळी येथे एका तरुणाचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२३ जुलै रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी २५ जुलै गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार लाडलेमशाक जमादार याच्या वाढदिवसानिमित्त २३ जुलै रोजी सायंकाळी तलवारीने केक कापण्यात आला होता. याबाबत सोशल मीडियावरून व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हीडीओ संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या हाती लागला. त्यावरून पोलीस कर्मचारी यांना तत्काळ आदेश देऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी लाडलेमशाक जमादार, अशपाक शेख, देविदास चौगुले, सद्दाम जमादार, वदू शेख, जावेद मुजावर या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे करीत आहेत.
----
तलवारीने केक कापणे नवीन ट्रेन्ड
तालुक्यातील नागणसुर येथे अशाच घटनेत कारवाई झालेले असताना नव्याने मातनहळळी गावात तशाच प्रकारचे घटना घडते. हे दुर्दैव आहे. वरील दोन्ही गावच्या घटना या हौशी कलाकारांनी, कार्यकर्ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्याची पोलिसांनी तत्काळ दखल घेत कारवाई केली.
---